बेळगाव बार असोसिएशनला १५० वर्षे पूर्ण
वर्धापन दिनानिमित्त कार्यालयाचे थाटात उद्घाटन

बेलगाम प्राईड / बेळगाव बार असोसिएशन अर्थात बेळगावच्या वकील संघटनेने आज आपल्या स्थापनेची १५० वर्षे पूर्ण केली आहेत. या दिडशे वर्षाच्या वर्धापन दिनाच्या स्मरणार्थ आयोजित कार्यालयाचा उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.
बेळगाव वकील कम्युनिटी हॉलच्या दुसऱ्या मजल्यावर आज सकाळी हा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता. बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. एस. एस. किडसण्णावर यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ झाला. यावेळी व्यासपीठावर संघटनेचे माजी अध्यक्ष बी. जे. गंगाई, ज्येष्ठ वकील ए. जी. कुलकर्णी, सांबरेकर, आर. जी. पाटील, अन्वर बरुदवले, शिंदीबेन्नूर आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते फित कापून कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर मुख्य कार्यक्रमात व्यासपीठावरील मान्यवरांनी परिस्थितीनुसार आपले विचार व्यक्त केले.

यावेळी बोलताना बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. एस. एस. किडसण्णावर यांनी माहिती दिली. ऑक्टोबर महिन्यात संघटनेचा १५० वा वर्धापन दिन मोठ्या प्रमाणावर साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सोहळ्याला देशातील सर्व न्यायाधीशांना आमंत्रित केले जाणार असून, हा सोहळा देशात एक आदर्श ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बेळगाव वकील संघटना यापुढेही वकिलांच्या हितासाठी आणि त्यांच्या विकासासाठी सतत कार्यरत राहील, असे ॲड. किडसण्णावर यांनी स्पष्ट केले.
कार्यालयाच्या उद्घाटन समारंभाला ॲड. बसवराज मुगळी, ॲड.शीतल रामाशेट्टी, ॲड. यल्लाप्पा दिवटे, ॲड. विश्वनाथ सुलतानापुरी, ॲड. सुमीत पुजेर, ॲड. विनायक निंगनूरी, ॲड. सुरेश नागनूरी, ॲड. अनिल पाटील, ॲड. अश्विनी हवालदार, ॲड. विरक्तमठ यांच्यासह बहुसंख्य वकील उपस्थित होते.




