Uncategorized

बेळगावमध्ये पूरस्थिती नियंत्रणात मात्र धोक्याची परिस्थिती नाही.

बेलगाम प्राईड : सध्या बेळगाव जिल्ह्यात पूरस्थिती पूर्णपणे नियंत्रणाखाली असून कोणतीही गंभीर पूरग्रस्त स्थिती नाही अशी माहिती बेळगावचे जिल्हाधिकारी महंमद रोशन यांनी माध्यमांसमोर दिली. भविष्यातील संभाव्य धोक्याचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज असून, महाराष्ट्रातील कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्क साधला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

बुधवारी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात प्रसारमाध्यमांशी बोलताना जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सद्यस्थितीची माहिती दिली. आतापर्यंतच्या पावसामुळे जिल्ह्यात दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, २२१ घरांचे अंशतः तर २ घरांचे पूर्णतः नुकसान झाले आहे. या बाधित कुटुंबीयांना नुकसानभरपाई देण्यात आली आहे. तसेच १४० हेक्टर कृषी जमीन आणि ५.२५ हेक्टर फळबागांना पुराचा फटका बसला आहे.

जिल्ह्यातील जलाशयांची स्थिती समाधानकारक आहे. हिडकल जलाशय ९० टक्के नवलतीर्थ जलाशय ७८ टक्के आणि मार्कंडेय जलाशय ९० टक्के भरले आहे. सध्या चिकोडी तालुक्यातील कलोळ बॅरेजमधून महाराष्ट्रातून येणाऱ्या पाण्याचा प्रवाह ४० क्युसेक इतका आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, जर पाण्याचा प्रवाह २ लाख क्युसेकपर्यंत पोहोचल्यास पूरस्थिती निर्माण होऊ शकते, यासाठी प्रशासनाने पूर्व तयारी केली आहे.

महाराष्ट्रातील विविध जलाशयांमधून पाणी सोडल्यास ते बेळगाव जिल्ह्यातील नद्यांपर्यंत पोहोचायला सुमारे ४-५ दिवस लागतात तर जिल्ह्यातून अलमट्टी धरणापर्यंत पाणी जाण्यासाठी ७ दिवसांचा कालावधी लागतो. यामुळे महाराष्ट्रातून येणाऱ्या पाण्याची पातळी आणि प्रमाण जाणून घेण्यासाठी आम्ही कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्कात असल्याची माहिती जिल्हाधिकारी महंमद रोशन यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!