कन्नडसक्ती विरोधात समिती तीव्र आंदोलन छेडणार
मध्यवर्ती समितीच्या बैठकीत घेण्यात आला निर्णय

बेलगाम प्राईड / बेळगाव आणि सीमाभागात प्रशासनाकडून वाढवण्यात येत असलेल्या कन्नड सक्तीविरोधात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने आक्रमक भूमिका घेतली आहे. समितीच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून, आगामी काळात तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
आज मराठा मंदिर येथे मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक पार पडली. तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती कार्याध्यक्ष मनोहर किणेकर यांनी बैठकीतील निर्णयांची माहिती दिली. ते म्हणाले की गेल्या दोन महिन्यांपासून बेळगावात प्रशासन कन्नड सक्तीचे वातावरण निर्माण करत आहे. महानगरपालिकेत इंग्रजी आणि मराठी भाषेतील फलक काढून कन्नड फलक लावण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर, कर्नाटकात अल्पसंख्याक असले तरी बेळगाव जिल्ह्यात १५ टक्क्यांपेक्षा अधिक मराठी भाषिक असल्याने, भाषिक हक्कांची अंमलबजावणी करण्यासंदर्भात २० जुलै नंतर जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन कन्नडप्रमाणेच मराठी भाषेत देखील व्यवहारासाठी निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सर्वोच्च न्यायालयातील याचिकेच्या कामकाजासंदर्भात लवकरात लवकर कोल्हापूर येथे तज्ज्ञ समितीच्या सदस्यांची भेट घेऊन निवेदन देण्यात येणार आहे. याचप्रमाणे, कन्नड सक्तीविरोधात ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात मोर्चा काढण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला असून, या अनुषंगाने घटक समितीच्या बैठका घेऊन पुढील रूपरेषा ठरविण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयातील याचिकेप्रकरणी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
माजी महापौर आणि म. ए. समिती सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर यांनी काही गोष्टी गुप्त ठेवणे मराठी भाषिकांच्या हिताच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याचे नमूद केले. ते म्हणाले, “सर्वच गोष्टी उघड करणे योग्य नाही. कन्नड सक्तीविरोधात समितीची भूमिका जाहीरपणे मांडण्याऐवजी ‘गनिमी काव्याप्रमाणे’ आपली भूमिका पेरणे हे समितीचे काम आहे.
कन्नड सक्तीविरोधात समिती कोणत्या पद्धतीने कार्यरत आहे हे चव्हाट्यावर ओरडून सांगणे गरजेचे नाही, यामुळे कर्नाटक सरकार जागरूक होते. काही गोष्टींमध्ये गुप्तता राखणे गरजेचे आहे.” कन्नड सक्तीविरोधात काढण्यात येणाऱ्या मोर्चासंदर्भात घटक समित्यांची बैठक घेऊन मोर्चा यशस्वी करण्यासाठी मध्यवर्तीकडून सूचना देण्यात आल्या असून, यानुसार मोर्चाची रूपरेषा ठरविण्यात येईल. सीमाभागातील समस्या आणि सीमाप्रश्न यासंदर्भात तज्ज्ञ समितीशी समन्वय साधून चर्चा करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही अष्टेकर यांनी सांगितले.
नव्या तज्ज्ञ समितीकडून या विषयांवर सीमाभागाजवळ नव्हे, तर सीमाभागातच बैठक घेण्यासंदर्भात विनंती करण्यात येत आहे. अँड.उज्वल निकम यांची राज्यसभा खासदार म्हणून निवड झाली आहे. बेळगाव मुक्कामी आलेल्या उज्वल निकम यांनी सीमाप्रश्नी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले असून, यासंदर्भात त्यांचीही भेट घेण्यासंदर्भात प्रयत्न सुरु असल्याचे मालोजीराव अष्टेकर यांनी सांगितले.




