Uncategorized

मराठीच्या व ई-खात्याच्या दराच्या आकारणी अशा मुद्दा वरून बैठक गाजली 

बेलगाम प्राईड / गुरुवारी बेळगाव महानगरपालिकेच्या सभेत मराठी भाषेच्या मुद्द्यावरून मोठा गदारोळ झाला. बेळगाव महानगरपालिकेच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत हायकोर्टाच्या आदेशाचे पालन करत पूर्वीप्रमाणेच कन्नडसोबत मराठी भाषेतही सभेचे इतिवृत्त देण्याच्या मागणीसाठी मराठी नगरसेवकांनी सभात्याग करण्यात आला. तर दुसऱ्या बाजूला ई-खाता गैरव्यवहार आणि बनशंकरी तलावाच्या नामकरणासारख्या महत्त्वपूर्ण विषयांवरही चर्चा झाली. या सभेत काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.

सभेच्या सुरुवातीला नूतन विरोधी पक्षनेते सोहेल संगोळी यांनी सभागृहाचे आभार मानले तर सत्ताधारी पक्षाचे नेते हनुमंत कोंगाळी यांनी त्यांचे अभिनंदन केले. महानगरपालिकेत कन्नडची सक्ती आणि केवळ कन्नडमध्येच सभेचे कामकाज सुरू असलेल्या कार्याला नगरसेवक रवी साळुंखे, शिवाजीराव मंडोळकर आणि वैशाली भातकांडे यांनी तीव्र विरोध दर्शवला. त्यांनी महापौरांच्या कारवरील मराठी फलक काढल्याचाही निषेध केला. यावर सत्ताधारी सदस्यांनी महापौरांच्या परवानगीशिवाय बोलल्याचा आक्षेप घेतला, परंतु मराठी नगरसेवकांनी हायकोर्टाच्या आदेशाची प्रत दाखवत आपले म्हणणे ठामपणे मांडले.

यावेळी बोलताना मराठी भाषिक नगरसेवक रवी साळुंखे यांनी कन्नड सक्तीला आमचा विरोध नाही. परंतु, सीमावादाचा मुद्दा अजूनही न्यायालयात प्रलंबित असल्याने हायकोर्टाच्या आदेशानुसार पूर्वीप्रमाणेच कन्नडसोबत मराठी भाषेतही सभेचे उत्तरे देण्यात यावी असे स्पष्ट केले. पूर्वीप्रमाणेच कन्नडसोबत मराठी भाषेतही परिपत्रके मिळावीत अशी मागणी करत नगरसेवक रवी साळुंखे, शिवाजी मंडोळकर आणि वैशाली भातकांडे यांनी सभागृहातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. यानंतर महापौरांनी काही काळासाठी सभागृहाचे कामकाज तहकूब केले.

सभात्यागानंतर मराठी नगरसेवकांनी उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांना निवेदन सादर केले आणि हायकोर्टाच्या आदेशानुसार पूर्वीप्रमाणेच कन्नडसोबत मराठी भाषेतही कागदपत्रे उपलब्ध करून देण्याची मागणी केली. यावर आमदारांनी चर्चा करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

यानंतर सभेला पुन्हा सुरुवात झाली असता, दक्षिणच्या लोकप्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केली. महानगरपालिकेचे कामकाज कायद्यानुसार चालले पाहिजे असे सांगत गोंधळ घालण्याची ही शेवटची वेळ आहे. यापुढे असे झाल्यास कारवाई करावी अशी मागणी त्यांनी महापौरांकडे केली. तसेच ई-खाता अर्जांवरूनही तीव्र नाराजी व्यक्त करत ई-खात्याच्या कामांसाठी हजारो रुपयांची मागणी केली जात असल्याच्या तक्रारींवरून आमदार अभय पाटील यांनी संताप व्यक्त केला. धामणे रस्त्याजवळ असलेल्या तलावात बनशंकरी देवीची मूर्ती असून विणकर समाजाकडून त्या तलावाला बनशंकरी देवीचे नाव देण्याची विनंती केली जात असल्याचा मुद्दा त्यांनी सभागृहात मांडला. सत्ताधारी पक्षाचे नेते हनुमंत कोंगाळी यांनीही महानगरपालिकेने या प्रस्तावाला मंजुरी द्यावी अशी मागणी केली.

आमदार आसिफ सेठ यांनी, बेळगाव दक्षिण भागातून ई-खात्यासाठी आलेल्या अर्जांची केवळ २५ रुपये शुल्क आकारून एका निश्चित दिवशी विल्हेवाट लावावी अशी मागणी केली. लोकांना आवश्यक कागदपत्रांची माहिती आधीच देणे गरजेचे असून एजंट्समार्फत कामे होत असल्याच्या तक्रारी येत असल्याचेही त्यांनी नमूद करत त्यांनीही या मताला दुजोरा दिला.

याच सभेत नगरसेवक नितीन जाधव, नगरसेवक राजशेखर ढोणी आणि नामनिर्देशित सदस्य रमेश सोंटक्की यांनीही अधिक शुल्क आकारणीवर नाराजी व्यक्त केली आणि प्रक्रिया अधिक सोपी करण्याची सूचना केली.

यावर महानगरपालिका आयुक्त शुभा बी. यांनी, ई-खात्याच्या नोंदणीसाठी विक्री करारपत्र, आधार कार्ड आणि कर भरलेल्या पावत्या सादर करणे आवश्यक आहे. नागरिकांनी मध्यस्थांचा सल्ला न घेता थेट बेळगाव वन केंद्रात जाऊन अर्ज सादर करावेत. बेंगळुरूमध्ये ‘प्रॉपर्टी काणजा’ ही योजना यशस्वी झाली आहे, परंतु बेळगाव या योजनेत अजून मागे आहे. त्यामुळे कागदपत्रांची जुळवाजुळव करणे आवश्यक आहे. एक लाख वीस हजार पर्यंत ए-खात्याचे अर्ज प्रलंबित आहेत. फक्त बी-खात्याचे अर्ज स्वीकारले जात आहेत आणि बॉंडवर खरेदी केलेल्या मालमत्तांचीच नोंदणी केली जात आहे, अशी माहिती दिली. गोडसेवाडी येथील पी डी नंबर प्रकरणावरूनही सभागृहात चर्चा झाली.

तसेच नजीक आलेल्या गणेश चतुर्थीच्या पूर्वतयारीसाठी संपूर्ण शहरभर खड्डे बनले असून गणेश चतुर्थी सुरू होण्यापूर्वी संपूर्ण रस्त्यांची डागडूज आहे खड्डे मोजून होणारे अनर्थ टाळले जावे यावरही चर्चा करण्यात आली. एकंदर आजची महानरगपालिकेची सभा हि विविध मुद्यांवरून गाजली असून आजच्या सभेत झालेल्या चर्चा, प्रस्ताव आणि मंजुरीनंतर भविष्यात कोणत्या घडामोडी घडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!