Uncategorized
Trending

नगरपंचायतीच्या दर्जा पण ‘एक ना धड भाराभर चिंध्या’ 

बेलगाम प्राईड / जिल्हाधिकाऱ्यांना पिरनवाडी व मच्छे परिसरातील नागरिकांनी नगरपंचायत निवडणुकी संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. नगरपंचायत होऊन देखील मागील 3-4 वर्षांपासून निवडणूक न झाल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली जात आहे. तर येथील विकास कामे होणार कशी ? असा प्रश्न उपस्थित केला आहे. पिरनवाडी मच्छे नगरपंचायतीच्या बाबतीत ही परिस्थिती असताना आता तालुक्यातील आणखी तीन ग्रामपंचायतींना नगरपंचायतीचा दर्जा देण्यासंदर्भात सुरू झालेल्या हालचाली पाहता सरकारकडून ‘एक ना धड भाराभर चिंध्या’ असा प्रकार असल्याचे बोलले जात आहे.

मागील तीन ते चार वर्षांपासून पिरनवाडी व मच्छे ग्रामपंचायतीना पट्टणपंचायतीचा दर्जा देण्यात आला आहे. मात्र येथील सुविधा आणि कामे रेंगाळल्याचे चित्र सध्यातरी पहावयास मिळत आहे. वैयक्तिक संगणक उतारे व इतर नागरी समस्यांनी नागरिक वैतागले आहेत. कामे घेऊन गेलेल्या नागरिकांना निवडणूक झाल्यानंतर पाहू अशी उत्तरे दिली जात आहेत. त्यामुळे नागरिकातून नाराजी व्यक्त केली जात आहे. दरम्यान निवडणुक होणार तरी कधी? असा प्रश्न निर्माण होत असतानाच तालुक्यातील आणखी तीन ग्रामपंचायतींना नगरपंचायतीचा दर्जा मिळणार असल्याचे भाकीत कांही लोकप्रतिनिधी करत आहेत. तथापी निवडणूकच नसेल तर दर्जा घेऊन करायचा काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सध्या मच्छे आणि पिरनवाडी नगरपंचायतीला अनेक समस्यांनी ग्रासले आहे. येथे सरकारी अधिकाऱ्यांची नेमणूक झाली असली तरी तेथील सोयी सुविधांच्या समस्या अद्याप आवासून उभ्या असल्यामुळे त्याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे.

मागील तीन ते चार वर्षापासून पिरनवाडी व मच्छे नगरपंचायत निवडणूक न झाल्यामुळे अनेक विकास कामे रेंगाळली आहेत. मात्र याचे या भागाच्या लोकप्रतिनिधींना सोयरसुतक नसल्याचे दिसून येत आहे. घोळात घोळ म्हणून आणखीन तीन ग्रामपंचायतींना नगरपंचायतीचा दर्जा देण्याचा हालचाली सुरू झाला आहेत. सरकारी दप्तरी याबाबत कागदपत्रांची हालचाल गतिमान झाली असली तरी अद्यापही स्पष्ट असा अधिकृत आदेश मिळाला नसल्याचे समजते.

बेळगाव तालुक्यातील हिंडलगा एम. के. हुबळी आणि अन्य एका ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा मिळणार आहे. मात्र मच्छे आणि पिरनवाडी येथील अवस्था पाहता त्या दर्जाचे करायचे काय? कारण ना निवडणूक ना विकास कामे, यामुळे नागरिकांची कुचंबना होऊन मोठी समस्या निर्माण झाली आहे. परिणामी पूर्वीचीच ग्रामपंचायत बरी असे म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

दरम्यान मागील चार वर्षापासून निवडणुकीच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना आता निवडणुकीचे वेध लागले असले तरी या निवडणुकीकडे सरकार कधी सकारात्मक दृष्ट्या पाहते हेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे सध्या तरी नगरपंचायतीचा दर्जा मिळालेल्या ग्रामपंचायतींच्या बाबतीत ‘एक ना धड भाराभर चिंध्या’ असेच म्हणण्याची वेळ आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!