प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे : पोलीस आयुक्त भूषण बोरसे
पोलिसांचे आवाहन; गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक

बेलगाम प्राईड ता.३० / गणेशोत्सव काळात प्रशासनातर्फे केल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करावे. गणेशोत्सवात कोणत्याही प्रकारची समस्या किंवा अडचण येत असल्यास संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस अधिकारी व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या शनिवारी झालेल्या बैठकीत पोलिस आयुक्त भूषण बोरसे यांनी करण्यात आली.
पोलिस आयुक्त कार्यालयातर्फे शनिवारी केपीटीसीएल कार्यालयात माळमारुती आणि मार्केट पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी पोलिस आयुक्त भूषण बोरसे यांनी, गणेशोत्सव अतिशय शांततेत चांगल्याप्रकारे पार पडावा.
पोलिस प्रशासनातर्फे सर्व प्रकारची तयारी केली जात आहे. आगामी काळात ज्या ठिकाणी समस्या आहेत तेथे पाहणी करून अडचणी दूर केल्या जातील, अशी माहिती दिली. मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष रणजीत चव्हाण पाटील यांनी शहरातील गणेशोत्सवाला मोठी परंपरा असून गणपती पाहण्यासाठी आणि विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. त्यामुळे उत्सव काळात गणेशभक्तांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नयेत याची दखल घ्यावी अशी सूचना केली.
लोकमान्य गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष विजय जाधव यांनी, उत्सव काळात येणाऱ्या अडचणींबाबत गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची मते जाणून घ्यावीत. दरवर्षी प्रशासनाकडून मंडळांना चांगल्या प्रकारचे सहकार्य केले जाते तरीही आगामी काळात कोणत्याही प्रकारची अडचण होऊ नये यासाठी आतापासूनच उपाययोजना कराव्यात असे मत त्यांनी व्यक्त केले. बैठकीमध्ये अनेक मंडळांच्या कार्यकत्यांनी गणेशोत्सवात भाषावाद निर्माण होणार नाही याची दखल घ्यावी, अशी मागणी केली. मध्यवर्ती महामंडळाचे संपर्कप्रमुख विकास कलघटगी यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रवीण पाटील, हेमंत हावळ, रोहित रावळ, इंद्रजीत पाटील, डॉ. बसवराज भागोजी यांच्यासह विविध मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.




