Uncategorized
Trending

श्री गणेशोत्सव संदर्भात हेस्कॉम गणेश महामंडळ पदाधिकाऱ्यांची बैठक

बेलगाम प्राईड /आगामी श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हेस्कॉम अधिकारी, लाईनमन्स आणि मध्यवर्तीय सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळ व लोकमान्य सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळ यांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आज पार पडली. बैठकीत श्री गणेशोत्सव निर्विघ्न पार पडावा या दृष्टीने हाती घ्यावयाची कामे आणि खबरदारी बाबत चर्चा करण्यात आली.

बेळगाव स्टेशन रोड येथील हेस्कॉम कार्यालय आवारातील श्री मारुती मंदिरामध्ये या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीत श्री गणेशोत्सवाशी संबंधित विविध विषयांवर चर्चा झाली. यावेळी गणेश महामंडळाच्या विजय जाधव, सागर पाटील ,विकास कलघटगी, महादेव पाटील, आदी पदाधिकाऱ्यांनी उत्सवाच्या काळात येणाऱ्या अडचणी निर्माण होऊ नये यासाठी हेस्कॉमच्या अखत्यारीतील समस्या मांडून त्यांचे निवारण करण्याची विनंती केली. तसेच सार्वजनिक गणेश मूर्ती अंत्यविधी व नेते वेळी रस्त्यावरील विजेच्या तारांचा अडथळा निर्माण होणार नाही याची दरवर्षीप्रमाणे दक्षता घ्यावी. कांही ठिकाणी विशेष करून शहापूर भागात रस्त्यावर जमिनीलगत असलेले विजेचे बॉक्स हटवावेत वगैरे मागण्या मांडल्या.

यावेळी हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांनी देखील श्री गणेशोत्सव निर्विघ्न सुरळीत पार पडण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. त्याचप्रमाणे श्री गणेश मंडपांसाठी वीज जोडणी, दुर्घटना घडू नये यासाठी दक्षता घेणे वगैरे आवश्यक गोष्टींबद्दल महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.

बैठकीनंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना मध्यवर्ती गणेश महामंडळाचे सागर पाटील आणि श्री लोकमान्य सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष विजय जाधव यांनी सांगितले की येत्या एक-दीड महिन्यात येणाऱ्या गणेशोत्सव संदर्भात आम्ही आठ-दहा दिवसांपूर्वी हेस्कॉमचे बेळगाव शहराचे कार्यकारी अभियंता मनोहर सुतार यांना एक निवेदन सादर केले होते. त्या निवेदनाची तात्काळ दखल घेऊन आज त्यांनी आमच्या समवेत हेस्कॉमच्या अधिकारी व लाईनमन्सची बैठक घेतली. या पूर्वी अशी बैठक कधीही झाली नव्हती ही बाब म्हणजे दोन्ही गणेशोत्सव महामंडळांकडून श्री गणेशोत्सव निर्विघ्न पार पडावा या दृष्टीने पुढे टाकलेले एक पाऊल आहे.

हेस्कॉमने श्री विसर्जन मिरवणूक मार्गातील बहुतांश अडचणी यापूर्वी दूर केल्या आहेत. दिवसें दिवस बेळगाव शहराची व्याप्ती वाढण्याबरोबरच सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळांची संख्या देखील वाढत आहे. परिणामी हेस्कॉम वरील कामाचा बोजाही वाढत आहे. शहरातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना आमची एक विनंती आहे.

की त्यांनी आपल्या श्रीमूर्तींची उंची मर्यादित ठेवावी. यासाठी सर्व मंडळांनी एकत्रित येऊन श्रीमूर्तीच्या उंचीची मर्यादा निश्चित करावी. गणेशोत्सव काळात सर्व मंडळांनी सार्वजनिक सुरक्षततेची काळजी घेतली पाहिजे. विजेच्या तारा एकमेकांना स्पर्श होऊन शॉर्टसर्किटची दुर्घटना होणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे. असे आवाहन करून येत्या श्री गणेशोत्सवा संदर्भात काही अडचणी समस्या असतील तर त्यांनी महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. त्यांच्या समस्या अडचणी सोडवण्याची ग्वाही आम्ही देत आहोत.

एकंदर शहरातील समस्त गणेश भक्त, सरकारी अधिकारी, लोकप्रतिनिधी, महामंडळाचे पदाधिकारी सदस्य वगैरे आपण सर्वांनी मिळून श्री गणेशोत्सव सण निर्विघ्न पार पाडून आणि येत्या काळासाठी चांगला संदेश देऊया असे विजय जाधव शेवटी म्हणाले. याप्रसंगी बेळगाव मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळ आणि लोकमान्य सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाचे अन्य पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!