Uncategorized
Trending

श्री मंगाई देवी यात्रोत्सवास प्रारंभ

बेलगाम प्राईड / वडगावची ग्रामदेवता आणि नवसाला पावणारी देवी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या श्री मंगाई देवीच्या यात्रोत्सवास मंगळवार (ता. 22) पासून उत्साहात प्रारंभ झाला. मंगळवारी यात्रा उत्सवाचा मुख्य दिवस असून त्यानंतर सुमारे आठवडाभर यात्रेची धूम राहणार आहे.

 यात्रेनिमित्त सुमारे महिनाभर देवीचे वार पाळण्यात आले होते. त्यानंतर मंगळवारी भरयात्रा साजरी करण्यात आली. तत्पूर्वी सकाळी देवीचे हक्कदार, पंचमंडळी व वडगाव ग्रामस्थांच्या वतीने संवाद मिरवणुकीने वडगाव परिसरातील विविध मंदिरात जाऊन पूजन करण्यात आले. त्यानंतर देवीला घालण्यात आलेले गाऱ्हाणे उतरवण्यात आले. त्यानंतर यात्रेची सुरुवात झाली. पहाटेपासूनच मंदिर परिसरात भाविकांची दर्शनासाठी रिघ लागलेली होती. गाऱ्हाणे उतरवल्यानंतर ओटी भरण्यासह नवस फेडण्यास सुरुवात झाली. वडगाव, जुने बेळगाव, शहापूर, अनगोळ, बेळगावसह धामणे, येळ्ळूर व विविध ठिकाणाहून आलेल्या तसेच महाराष्ट्र, गोवा राज्यातील असंख्य भाविकांनी देवीचे दर्शन घेण्यासह नवस फेडला. यात्रेदिवशी बऱ्याच प्रमाणात पावसाने उघडीप दिली होती. त्यामुळे भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. अधून मधून पावसाच्या सरी येत होत्या. तरी भाविकांचा उत्साह टिकून होता.

यात्रेनिमित्त पाटील गल्ली, वडगाव येथील मंगाई देवी मंदिराची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. तर मंदिर मार्गावर ओटी भरण्याचे साहित्य, विविध प्रकारचे स्टॉल, खेळण्याचे साहित्य, मनोरंजनाचे साहित्य मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत. ग्रामदेवतेच्या उत्सवाच्या स्वागतासाठी विविध राजकीय, सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने बॅ. नाथ पै. सर्कल शहापूर पासून वडगाव परिसर, नाझर कॅम्प, वाडा कंपाऊंड आधी भागात स्वागत कमानी आणि फलक उभारण्यात आले आहेत.

 गेल्या वर्षीपासून यात्रेत पशुबळीवर निर्बंध घालण्याचा आदेश जिल्हा प्रशासनाने बजावला आहे. या आदेशाचे पालन करून यात्रा साजरी करण्यात येत आहे. दरम्यान, भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये भाविकांसाठी स्वतंत्र व्यवस्था केली आहे. त्यामुळे दर्शन घेणे सोयीचे जात आहे. मंदिर परिसरासह पाटील गल्ली पेव्हर्स घालण्यात आल्याने भाविकांना यंदा तितकाचा त्रास जाणवला नाही. यात्रेचा मुख्य दिवस मंगळवार असला तरी पुढील किमान आठवडाभर यात्रेनिमित्त भाविकांची गर्दी राहणार आहे. यात्रेनिमित्त विविध प्रकारच्या साहित्य विक्रीतून लाखोंची उलाढाल होत असते.

 ग्रामदेवतेच्या दर्शनासाठी दिवसभरात नगरसेवक, नगरसेविकांसह मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली. यात्रोत्सवास कोणतीही अनुचित घटना घडू नये, यात्रा शांततेत आणि सुव्यवस्थेत पार पडण्यासाठी पोलीस प्रशासनाने बंदोबस्त ठेवला आहे. तर विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!