महापौर, उपमहापौरांच्या आणि नगरसेवकांच्या उपस्थितीत ‘राकसकोप येथे गंगापूजन

बेलगाम प्राईड / बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप धरणाने यंदा पूर्ण पातळी गाठल्यामुळे शहरवासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या वतीने महापौर मंगेश पवार आणि उपमहापौर वाणी जोशी यांच्यासह सर्व नगरसेवक, विविध अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत धरणावर विधिवत गंगापूजन करण्यात आले.
या प्रसंगी बोलताना महापौर मंगेश पवार यांनी यंदा धरण पूर्ण भरल्यामुळे बेळगावातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाही, असा विश्वास व्यक्त केला. तर महापालिका आयुक्त शुभा बी. यांनीही पाणीपुरवठा प्रकल्पाची माहिती दिली.
शहराच्या ५८ प्रभागांपैकी ४८ प्रभागांमध्ये पाणीपुरवठा करण्यासाठी जलवाहिनी टाकण्याचे काम एल अँड टी कंपनीला दिले आहे. त्यापैकी दोन प्रभागांचे काम पूर्ण झाले असून, उर्वरित काम २६ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याची अंतिम मुदत देण्यात आली आहे. पाण्याची गळती टाळण्यासाठी एक विशेष पथक तयार करण्यात आले असून नागरिकांनीही पाण्याचा वायफळ वापर टाळून जपून वापर करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
मात्र या कार्यक्रमाला एल अँड टी विभागाने काही अधिकारी व नगरसेवक पत्रकार यांना माहिती देण्यापूर्वीच या कार्यक्रमाचे गंगापूजन करण्यासाठी आयोजन केल्याने काही नगरसेवक व पत्रकार यामध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली.
यावेळी महापौर मंगेश पवार आणि उपमहापौर वाणी जोशी, मनपा आयुक्त शुभा बी. यांच्यासह सर्व नगरसेवक, विविध अधिकारी आणि पालिका कर्मचारी उपस्थित होते.




