
बेलगाम प्राईड /पॅरा टार्गेट शूटिंग असोसिएशन पुणे आणि आर्यन ग्रुप ऑफ कंपनीज यांनी पॅरालिम्पिक कमिटी ऑफ इंडियाच्यावतीने आयोजित ‘इंडिया ओपन पॅरा स्विमिंग चॅम्पियनशिप -2025 मध्ये शक्ती, वेग आणि उत्साहाचे प्रेरणादायी प्रदर्शन करत दिव्यांग (पॅरा) जलतरणपटू बुशरा मुजावरने उल्लेखनीय कामगिरी केली.
श्री शिव छत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे, महाराष्ट्र येथे गेल्या दिनांक 17 व 18 ऑगस्ट 2025 रोजी उपरोक्त प्रतिष्ठेच्या दिव्यांगांच्या खुल्या जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत बेळगावच्या बुशरा मुजावर हिने श्रेणी एस14 – बौद्धिकदृष्ट्या दुर्बल विभागातील 100 मी. फ्रीस्टाइल शर्यतीत रौप्य पदक आणि 100 मी. बॅकस्ट्रोक शर्यतीत कांस्य पदक पटकावले. बुशरा मुजावर ही केएलईच्या जेएनएमसी ऑलिम्पिक आकाराच्या जलतरण तलावात येथे उमेश कलघटगी, अक्षय शेरेगर, अजिंक्य मेंडके, नितीश कुडूचकर, गोवर्धन काकतकर, इम्रान उचगावकर आणि विनायक आंबेवाडीकर या प्रशिक्षकांच्या समर्पित मार्गदर्शनाखाली पोहण्याचे प्रशिक्षण घेत सराव करते. तिला आई-वडिलांसह डॉ. प्रभाकर कोरे (अध्यक्ष, केएलई सोसायटी), जयंत हुंबरवाडी (अध्यक्ष, जयभारत फाउंडेशन), राम मल्ल्या (अॅलाइड फाउंडर्स प्रा. लि.), एसएलके ग्रुप, बेंगलोर, रो. अविनाश पोतदार, श्रीमती मानेक कपाडिया, श्रीमती लता कित्तूर, सुधीर कुसाणे, प्रसाद तेंडोलकर आणि इतर अनेक हितचिंतकांचे प्रोत्साहन लाभत आहे.




