पत्रकारिता सोपी झाली मात्र, पत्रकारांवरील जबाबदारी वाढली : प्रवीण टाके
बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाचा वर्धापन दिन साजरा

बेलगाम प्राईड / बदलत्या युगात पत्रकारितेत बरेच बदल घडत आहेत. आजच्या डिजिटल युगात पत्रकारिता सहज सोपी झाली असली तरी पत्रकारांवरील जबाबदारी वाढली असल्याचे मत कोल्हापूर जिल्हा माहिती विभागाचे उपसंचालक प्रवीण टाके यांनी व्यक्त केले.
बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वर्धापन दिन कार्यक्रमात ते बोलत होते. कुलकर्णी गल्ली येथील जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात पत्रकार संघाचा 48 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रवीण टाके यांच्यासह कोल्हापूर विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष समीर देशपांडे तसेच कोल्हापूर विभागीय माहिती कार्यालयाचे उपसंपादक रणजीत पवार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

या कार्यक्रमात बोलताना टाके म्हणाले की, माध्यम क्षेत्रात डिजिटल मीडियाचे महत्त्व वाढले आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे पत्रकारिता जरी सोपी झाली असली तरी पत्रकारांवरील जबाबदारी देखील तितकीच वाढली आहे. बदलत्या युगात पत्रकाराने नवे तंत्रज्ञान अवगत करणे ही काळाची गरज आहे. भावी काळात पत्रकारांनी जबाबदारीने काम करणे महत्त्वाचे आहे. बेळगाव सीमाभागातील पत्रकार तळमळीने पत्रकारिता करत आहेत. सीमाभागातील
पत्रकारांच्या मागण्यांना शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल. मुख्यमंत्री स्वतः पत्रकारांच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करतात. सीमा भागातील पत्रकारांच्या मागण्या संदर्भात आपण स्वतः जातीने शासन दरबारी पाठपुरवठा करू असे आश्वासन देखील टाके यांनी यावेळी दिले.
समीर देशपांडे बोलताना म्हणाले की, कोल्हापुरातील पत्रकारानी बेळगावसह सीमा भागातील मराठी भाषिकांच्या भावनांचा नेहमी आदर केला आहे. महाराष्ट्रातील पत्रकारानी महाराष्ट्रातील नेत्यांना सीमा प्रश्नाबद्दल निर्भीडपणे जाब विचारला आहे. बेळगावातील मराठी भाषिक जनता व येथील मराठी पत्रकारांवर कर्नाटक सरकार नेहमीच अन्याय करत आहे याची आम्हाला जाणीव आहे. बेळगाव मराठी वृत्तपत्र चालवणे अत्यंत कठीण काम आहे. सीमाभागात पत्रकारिता करणे म्हणजे मराठी पत्रकारांना आव्हानात्मक आहे. कोरोना काळानंतर माध्यमांची स्थिती बिकट बनली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने पत्रकारांसाठी जाहीर झालेल्या विविध योजनांची माहिती रणजीत पवार यांनी यावेळी दिली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. पत्रकार संघाचे अध्यक्ष कृष्णा शहापूरकर यांनी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत आणि प्रास्ताविक केले. शेखर पाटील यांनी सूत्रसंचालन केले तर सुहास हुद्दार यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमाला माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर, प्राध्यापक आनंद आपटेकर, उमेश पाटील, किरण हुद्दार यांच्यासह पत्रकार संघाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.




