
बेलगाम प्राईड/ बेळगाव शहरात आज जय किसान खासगी भाजी मार्केटविरोधात हजारो शेतकऱ्यांनी पावसात भिजत तीव्र आंदोलन केले. या मार्केटचा परवाना रद्द होऊनही ते त्वरित हटवले जात नसल्यामुळे, विविध तालुके आणि जिल्ह्यांतून आलेल्या शेतकरी बांधवांनी राणी चन्नम्मा सर्कलवर भव्य मोर्चा काढून न्यायासाठी जोरदार निदर्शने केली.
आंदोलनादरम्यान शेतकरी नेते राजू नायक यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, “शेतकरी कायद्याचे उल्लंघन करणारे नाहीत; आम्ही कायद्याचा आदर करतो. जिल्हाधिकाऱ्यांनी कोणत्याही लोकप्रतिनिधींच्या आदेशानुसार नव्हे, तर शेतकरी आणि जनतेचा आवाज बनून काम करावे.”
शेतकरी नेते चूनप्पा पुजारी यांनी आपले मत अधिक परखडपणे मांडले. ते म्हणाले, “खासगी भाजी मार्केटचा परवाना रद्द झाला असतानाही कारवाईसाठी शेतकऱ्यांनीच का रस्त्यावर उतरावे लागत आहे, हे कळत नाही. सरकारी एपीएमसी (कृषी उत्पन्न बाजार समिती) मध्ये दररोज ४०० ते ५०० वाहने येतात आणि शेतकऱ्यांना पारदर्शक सेवा दिली जाते. खासगी मार्केटमुळे सरकारला एक पैसाही कर मिळत नाही. आमच्यासोबत हा द्वेष का? आम्ही छातीवर गोळ्या झेलण्यासही तयार आहोत!”
शेतकऱ्यांनी आपली मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत जेवण न करण्याची भूमिका घेतली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. ते पावसात भिजतच शेतकऱ्यांशी बोलले.
जिल्हाधिकारी म्हणाले, “यावर कायदेशीर मार्गाने तोडगा काढला जाईल. तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ जाऊन जेवण करा. आज संध्याकाळपर्यंत यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात येईल.
बाजूलाच रुग्णालय आणि शाळा असल्यामुळे सार्वजनिक रस्ता बंद करणे योग्य नाही.” जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर शेतकरी तात्पुरते जिल्हाधिकारी कार्यालयाकडे गेले. मात्र, त्यांनी तिथेही आपले ठिय्या आंदोलन सुरूच ठेवले.




