
बेलगाम प्राईड/ येथील नीरा पुरोहित हिने जगातील सर्वात कठीण मानल्या जाणाऱ्या ‘खारदुंगल चॅलेंज ७२ किमी’ ही अल्ट्रामॅरेथॉन पूर्ण करून इतिहास रचला आहे.
ही शर्यत १७,६१८ फूट उंचीवर घेतली जाते, जिथे ऑक्सिजनचे प्रमाण समुद्रसपाटीपेक्षा जवळजवळ निम्मे असते. त्यामुळे ही स्पर्धा धैर्य, शारीरिक व मानसिक क्षमता आणि चिकाटीची खरी कसोटी ठरते. मागील वर्षी नीराने लडाखमध्ये ४२.२ किमी मॅरेथॉन पूर्ण करून या चॅलेंज साठी पात्रता मिळवली होती. यावर्षी तिने केवळ खारदुंगल चॅलेंज ७२ किमी पूर्ण केले नाही, तर लडाख हाफ मॅरेथॉनमध्येही यशस्वी सहभाग नोंदवून दुहेरी पराक्रम केला.

खारदुंगल चॅलेंज मधील ३२व्या किलोमीटरवर नीराला ॲक्युट माउंटन सिकनेस (AMS) आला. भोवळ येणे, तोल जाणे आणि श्वास घ्यायला त्रास होणे अशी लक्षणे होती. मात्र संयम ठेवत, एकेक पाऊल पुढे टाकत, श्वासावर नियंत्रण ठेवत उरलेले ४० किमी पूर्ण करून तिने आपले स्वप्नातील फिनिश लाईन गाठली.
दोन मुलांची अभिमानी आई आणि कुटुंब व्यवसाय कळ्याणी स्वीट्सची प्रमुख असलेली नीरा आपल्या जबाबदाऱ्या आणि धावण्याची आवड यांचा सुंदर समतोल राखते. फुल व हाफ मॅरेथॉनपासून गोवा हेल रेस ६० किमी सारख्या अल्ट्रामॅरेथॉनपर्यंत तिने अनेक शर्यतींमध्ये केवळ सहभाग घेतला नाही, तर अनेक वेळा पोडियम फिनिशही मिळवला आहे. तिच्या कामगिरीनंतरही ती अतिशय नम्र राहून इतरांसाठी प्रेरणास्थान ठरते. शिस्त, धैर्य आणि चिकाटीने कोणतेही पर्वत जिंकता येतात हे ती स्वतःच्या कृतीतून दाखवून देते.




