
बेलगाम प्राईड/ बेळगाव येथील गुड शेफर्ड सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नुकत्याच झालेल्या बॉक्सिंग तसेच स्केटिंगच्या राज्य आणि विभागीय स्तरावरील स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
नुकत्याच पार पडलेल्या कर्नाटक राज्य चॅम्पियनशिप आणि सीबीएसई दक्षिण विभागीय चॅम्पियनशिपमध्ये भूमिका किरोजी आणि गणेश कांबळे यांनी बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक मिळवले तर वृतिका कोळुरमठ, इव्हॅन्जेलिन डिसोझा आणि मोहम्मद नुमान यांनी रौप्यपदक पटकावले. नैतिक भाटी यांनी कांस्यपदक मिळवले. स्केटिंगमध्ये सौरभ साळुंखे याने एक सुवर्ण आणि एक रौप्यपदक जिंकले असून अनघा जोशी हिने रौप्यपदक मिळवले आहे.
सध्या चार बॉक्सर — भूमिका किरोजी, वृतिका कोळुरमठ, इव्हॅन्जेलिन डिसोझा आणि मोहम्मद नुमान — यांची निवड येत्या ४ नोव्हेंबर रोजी बंगळुरू येथे होणाऱ्या मिनी ऑलिंपिक चॅम्पियनशिपसाठी बेळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झाली आहे. स्केटिंगचे विद्यार्थी चंदीगड येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होणार आहेत. या विद्यार्थ्यांना प्रशिक्षक सत्येंद्र त्रिपाठी (बॉक्सिंग) आणि सूर्यकांत हिंडलगेकर (स्केटिंग) यांनी त्यांच्या संबंधित खेळांमध्ये मार्गदर्शन केले आहे.
संस्थेचे चेअरमन राज घाटगे, एसबीजी आयुर्वेदिक कॉलेजचे चेअरमन अमित घाटगे, व्यवस्थापकीय संचालिका प्रेरणा घाटगे आणि शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती प्रचिती आंबेकर यांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या आगामी स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.




