मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरतर्फे ‘इन्फंट्री डे ’निमित्त शहीद जवानांना अभिवादन

बेलगाम प्राईड/ येथील मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरमध्ये ७९ वा ‘इन्फंट्री डे’ अत्यंत श्रद्धा व अभिमानाने साजरा करण्यात आला. देशाच्या संरक्षणासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या इन्फंट्रीच्या शूरवीरांना या निमित्ताने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
‘शरकत वॉर मेमोरियल’ येथे आयोजित पुष्पचक्र अर्पण समारंभात ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी, कमांडंट, मराठा LIRC आणि मेजर जनरल राकेश मनोचा, एसएम, व्हीएसएम, कमांडर, ज्युनिअर लीडर्स विंग यांनी शहीद जवानांना अभिवादन केले. या प्रसंगी माजी सैनिक, अधिकारी, ज्युनिअर कमिशंड ऑफिसर्स तसेच इतर सैनिक यांनी सहभाग घेतला.

मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर, ज्युनिअर लीडर्स विंग आणि स्टेशनमधील सर्वांनी एकत्र येऊन शौर्य, त्याग आणि कर्तव्यनिष्ठेच्या परंपरेला अभिवादन केले. यावेळी रेजिमेंटच्या गौरवशाली इतिहासाचा आणि भारतीय इन्फंट्री सैनिकांच्या अदम्य धैर्याचा गौरव करण्यात आला. सीमांचे रक्षण करणाऱ्या या शूरवीरांचा अभिमान व्यक्त करत त्यांच्या अद्वितीय शौर्याची पुन्हा एकदा उजळणी करण्यात आली.
कार्यक्रमाची सांगता डिफेन्स ऑफिसर्स मेस अँड इन्स्टिट्यूट बेळगाव येथे आयोजित सामाजिक संध्याकाळने झाली. याप्रसंगी सेवारत अधिकारी आणि माजी सैनिक एकत्र येऊन आपुलकी, स्नेह व कृतज्ञतेच्या वातावरणात ‘इन्फंट्री डे’ साजरा केला.




