ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या संघर्षाला सरकारचा नतमस्तक!
प्रति टन ३,३०० रुपयांची आधारभूत किंमत जाहीर
बेलगाम प्राईड/ राज्य सरकारने अखेर ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या सातत्यपूर्ण संघर्षासमोर नतमस्तक होत प्रति टन ३,३०० रुपयांची आधारभूत किंमत जाहीर केली आहे.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अध्यक्षतेखाली आज विधानसौध येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत साखर कारखानदार तसेच ऊस उत्पादक शेतकरी नेते उपस्थित होते. निर्णयानुसार पहिल्या टप्प्यात शेतकऱ्यांना ३,२०० रुपये दिले जातील. त्यानंतर सहा महिन्यांच्या आत आणखी ५० + ५० रुपये देण्यात येतील.
म्हणजेच एकूण प्रति टन ३,३०० रुपयांचा दर निश्चित करण्यात आला आहे. सरकारकडून ५० रुपये आणि साखर कारखान्यांकडून ५० रुपये या स्वरूपात अतिरिक्त रक्कम दिली जाणार आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी यापूर्वी प्रति टन ३,५०० रुपयांचा दर देण्याचा ठाम आग्रह धरला होता. राज्यभरातील विविध जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन तीव्र झाले होते. तर बेळगाव येथील आंदोलनाला हिंसक वळणही लागले होते. या पार्श्वभूमीवर सरकारने समेटाचा निर्णय घेतला आहे. बैठकीनंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि साखर मंत्री शिवानंद पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली.
त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले की “ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्याबाबत सरकार कटिबद्ध आहे. आम्ही पंतप्रधानांना पत्र लिहून साखरेच्या एमएसपीत वाढ करण्याची मागणी केली आहे. केंद्र सरकारकडून वेळ मिळाल्यास आम्ही उद्याच शिष्टमंडळ घेऊन दिल्लीला जाण्यास तयार आहोत. या निर्णयात कोणतेही राजकारण नसल्याचे त्याने सांगितले शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारने घेतलेला हा निर्णय सर्वांनी स्वीकारावा. अशी विनंती सरकारच्या वतीने करण्यात आली आहे.




