
बेलगाम प्राईड / दुचाकी वाहनांची चोरी करणाऱ्या एका चोरट्याला हिरेबागेवाडी पोलिसांनी गुरुवारी अटक करून त्याच्या जवळून 2 लाख 70 हजार रुपये किमतीच्या चार मोटारसायकली जप्त केल्या आहेत.
पोलिसांनी अटक केलेल्या चोरट्याचे नांव अजय उर्फ अजित बसवराज बजंत्री (वय 19 )रा. अळणावर असे या युवकाचे नाव असून तो गवंडी कामगार आहे. काल गुरुवारी चोरलेल्या मोटर सायकल वरून संशयास्पदरित्या जाणाऱ्या अजय याला हिरेबागेवाडी पोलिसांनी अडवून चौकशी केली.
त्यावेळी त्या युवकाने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली.अजय याला पोलीस खाक्या दाखवताच त्याने हिरेबागेवाडी, अळणावर, धारवाड उपनगर, आणि कित्तूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून मोटरसायकली चोरल्याची कबुली दिली.
त्यानंतर पोलिसांनी त्याच्या जवळील हिरोहोंडा स्प्लेंडर प्लस क्र. केए 22 ईके 4078 किंमत 45,000 रुपये, हिरो होंडा एचएफ डिलक्स क्र. केए 25 ईएम 8053 किंमत 75,000 रु., बजाज डिस्कव्हर क्र. केए 26 एल 7735 किंमत 75,000 रु. आणि हिरो स्प्लेंडर प्लस क्र. केए 24 क्यू 5968 किंमत 75,000 रुपये अशा एकूण चार चोरी केलेल्या मोटरसायकली जप्त केल्या.
बेळगाव ग्रामीणचे एसीपी बी. एम. गंगाधर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि हिरेबागेवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एस. के. होळेण्णावर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक अविनाश ए. वाय., उपनिरीक्षक बी. के. मिटगार, पोलीस एम. आय. तुरमरी, गुरुसिद्ध पुजारी, एम. जी. माणिकबार, महांतेश कडन्नावर आर. आर. केळगिनमनी यांनी ही कारवाई केली. याप्रकरणी हिरेबागेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे.




