
बेलगाम प्राईड /गतवर्षी तब्बल 20 कोटी रुपयांच्या नुकसानभरपाई प्रकरणामुळे मोठ्या चर्चेत आलेला आणि जवळपास वर्षभरापासून बंद असलेला शहापूर येथील बँक ऑफ महाराष्ट्र ते जुन्या पी.बी. रोडपर्यंतचा शिवसृष्टी समोरील रस्ता अखेर 40 फूट रुंद करून खुला करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नागरिकांच्या मागणीची दखल घेत जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी पुढाकार घेऊन मार्ग मोकळा केला असल्याची माहिती निदर्शनास आली आहे.
या रस्त्यासंदर्भात पूर्वी सीडीपीतील रस्ता अलाइनमेंट न पाहता रीतसर भूसंपादन न करता रस्ता तयार करण्यात आला होता. परिणामी अनेक निवासी, व्यावसायिक व औद्योगिक मालमत्तांवर अतिक्रमणाचे परिणाम झाले होते.
या कारणाने जमीनधारकांनी उच्च न्यायालयात धाव घेत नुकसानभरपाईची मागणी केली होती. न्यायालयानेही नुकसानभरपाई देण्याचा आदेश बजावला होता. आणि महापालिकेवर तब्बल 20 कोटी रुपयांची भरपाईची वेळ आली होती.
न्यायालयीन आदेशानुसार सप्टेंबर 2024 मध्ये महापालिकेने संबंधित जागा पुन्हा मूळ मालकाला परत दिल्यानंतर हा रस्ता पूर्णतः बंद करण्यात आला. त्यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला होता. मात्र, नागरिकांचा सातत्याने पाठपुरावा आणि महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत झालेल्या चर्चेनंतर उपायाचा मार्ग शोधण्यात आला.
आता सीडीपीमध्ये मंजूर असलेल्या मूळ रस्ता आराखड्यानुसार 40 फूट रुंदीचा रस्ता खुला करण्याचा पर्याय अंतिम करण्यात येत असून, महापालिका आयुक्त शुभा बी. यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वेक्षण प्रक्रिया सुरू आहे. सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष रस्ता मोकळा करण्याची कार्यवाही होईल. या निर्णयामुळे गेल्या वर्षभरापासून त्रस्त नागरिकांना दिलासा मिळणार असून, शहापूर परिसरातील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.




