Uncategorized
Trending

मुख्यमंत्रिपदावर सिद्धरामय्याच राहणार; मंत्री सतीश जारकीहोळी

बेलगाम प्राईड / राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे. सिद्धरामय्या हे अत्यंत खंबीर असून, तेच पुढील पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी मुख्यमंत्रीपदी कायम राहतील, अशा शब्दांत जारकीहोळी यांनी मुख्यमंत्र्यांच्या बाजूने जोरदार समर्थन केले आहे. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांवर भाष्य केले. “मंत्रिमंडळ पुनर्रचनेचा विषय पूर्णपणे हायकमांडच्या अखत्यारीत आहे. तसेच मंत्र्यांचे दिल्लीला वारंवार जाणे हे केवळ कामाच्या निमित्ताने असते,” असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

“पुनर्रचनेबद्दल आमच्यासोबत कोणत्याही प्रकारची चर्चा होत नाही. त्याबाबतचा अंतिम निर्णय हायकमांडला घ्यायचा आहे. मंत्रिमंडळाची पुनर्रचना झाल्यास आम्ही वाल्मिकी समाजासाठी आणखी दोन जागांची मागणी पक्षाकडे केली आहे. ही मागणी यावेळी मान्य झाल्यास समाजाचे भले होईल. मात्र, आम्ही कोणत्याही विशिष्ट व्यक्तीला संधी द्यावी, असा आग्रह धरत नाही,” असे त्यांनी नमूद केले.

कर्नाटकमधील राजकारणात ‘अहिंद’ समूहाला अधिक महत्त्व आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. “बिहारमध्ये सर्व वर्गांना एकत्र आणणे शक्य झाले नाही, पण कर्नाटकात सर्व ‘अहिंदा’ गटांना एकत्र आणणे शक्य आहे,” असे त्यांनी सांगितले. “बिहार निवडणुकीच्या निकालावर गंभीर चर्चा होणे आवश्यक आहे.

जिंकणे किंवा हरणे, दोन्ही परिस्थितीत निकालावर विचारमंथन झाले पाहिजे. विशेषत: आपण का हरलो, याचे विश्लेषण व्हायला हवे. बिहारमध्ये आमच्या गॅरंटी योजना नव्हत्या, परंतु विरोधकांच्या गॅरंटी योजना यशस्वी झाल्या. ‘मत चोरी’ प्रकरणावर आमचे वरिष्ठ नेते योग्य तो निर्णय घेतील,” अशी प्रतिक्रिया त्यांनी नोंदवली.

कित्तूर राणी चन्नम्मा प्राणीसंग्रहालयात झालेल्या हरणांच्या मृत्यू प्रकरणावर बोलताना त्यांनी लक्ष घालण्याची ग्वाही दिली. “तो भाग आमच्या मतदारसंघात येतो. नक्की काय घडले आहे? त्यांना काही रोग झाला होता की योग्य उपचार मिळाले नाहीत, याबाबतची पाहणी आणि तपासणी केली जाईल,” असे त्यांनी म्हटले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!