आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिव्हल, पुणे महोत्सवात बेळगावच्या पाच सावित्रींच्या लेकींची निवड

बेलगाम प्राईड/ क्रांतिसुर्य महात्मा जोतिराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी पुण्यातील भिडेवाडा येथे मुलींची पहिली शाळा सुरु करुन महिलांसाठी स्त्रीशिक्षणाचे द्वार खुले करुन देण्याचे पवित्र कार्य केले. उभयतांच्या या उत्तुंग कार्यकर्तृत्वाचा प्रचार,प्रसार व भारतीय संविधानाविषयी जनजागृती करण्याच्या उदात्त हेतूने पुण्यामध्ये संविधान दुत आदरणीय विजय वडवेराव यांच्या पुढाकारातून आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे.
हे आंतरराष्ट्रीय फेस्टिव्हलचे दुसरे वर्ष आहे. एस.एम.जोशी सभागृह पुणे येथे सदर महोत्सवाचे आयोजन केले आहे.या 2026 च्या महोत्सवात बेळगाव जिल्ह्य़ातून सावित्रींच्या पाच लेकींची निवड झाली आहे. सौ.अस्मिता आळतेकर, सौ.रोशनी हुंद्रे,प्रा.सौ.शुभदा प्रभूखानोलकर, प्रा.डाॅ.सौ. मनिषा नाडगौडा,सौ.पुजा सुतार यांना विशेष निवडपत्र पाठवून आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिव्हलच्या काव्यजागर विचारमंचावर निमंत्रित केले आहे. प्रत्येक कवी- कवयित्री या महोत्सवात अध्यक्ष असणार आहेत.
एकाच कार्यक्रमाचे शेकडो अध्यक्ष असणे ही समतावादी विचारधाराची साक्ष व जगातील एकमेव ऐतिहासिक घटना म्हणावी लागेल.तसेच जवळजवळ 1000 संविधान ग्रंथांचे वाटप होणार आहे.या चार दिवसीय महोत्सवात ईतर सांस्कृतिक कार्यक्रमांचेही भरगच्च आयोजन करण्यात आले आहे.अशा भव्यदिव्य महोत्सवाच्या विचारपिठावर या पाच जणींना संधी मिळणे ही बेळगावकरांसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे.बेळगावमधून या पाच सावित्रींच्या लेकींची निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.




