Uncategorized
Trending

बेळगावचे बिशप डेरेक फर्नांडिस यांनी गृहमंत्री व मुख्यमंत्र्यांची घेतली भेट 

बेलगाम प्राईड : गदग जिल्ह्यातील गजेन्द्रगड येथे होली फॅमिली स्कूल परिसरात प्रस्तावित पाद्री निवासस्थान व छोटे चर्च बांधकामा वरून निर्माण झालेला वाद आता राज्याच्या वरिष्ठ नेतृत्वापर्यंत पोहोचला आहे. बेळगाव डायोसिजचे बिशप डेरेक फर्नांडिस यांनी मंगळवारी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, गृहमंत्री डॉ.जी.परमेश्वर व कायदा मंत्री एच. के. पाटील यांची भेट घेऊन या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी करणारे निवेदन सादर केले. त्यांच्यासोबत आमदार आयव्हान डिसोझा, लुईस रॉड्रिग्स आणि फादर प्रमोद कुमार उपस्थित होते.

निवेदनात बिशप फर्नांडिस यांनी नमूद केले की, होली फॅमिली स्कूल हे बेळगाव डायसिस बोर्ड ऑफ एज्युकेशन व बेथनी सिस्टर्स संस्थेद्वारे 11 वर्षांपूर्वी स्थापन झाले असून अलीकडेच पहिल्या SSLC बॅचने उत्तीर्णता मिळवली आहे. मुख्य शाळेचे व्यवस्थापन डायसिसकडे तर बालवाडी विभागाचे संचालन बेथनी सिस्टर्सकडे आहे.

शाळेशी संबंधित पाद्री, शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या धार्मिक गरजांसाठी रामापूर ग्राम पंचायत हद्दीतील बिगरशेती निवासी जमिनीवर प्रेस्बिटरी व छोटे चर्च बांधण्याचे नियोजन करण्यात आले. ग्राम पंचायतीने 10 मार्च 2025 रोजी ठराव मंजूर केला होता आणि 24 जुलैला अधिकृत परवानगीही दिली होती. 30 ऑक्टोबरपासून बांधकामाला सुरुवात झाली होती आणि प्राथमिक पायाभरणी पूर्ण झाली होती.

मात्र, स्वत:ला विश्व हिंदू परिषदेशी संबंधित सांगणाऱ्या एका गटाने ग्राम पंचायतीकडे धर्मांतराच्या आरोपांसह हरकत नोंदविल्यानंतर अचानक बांधकाम थांबवण्यात आले. हे आरोप “पूर्णतः खोटे व निराधार” असल्याचे बिशप फर्नांडिस यांनी स्पष्ट केले.

सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण असूनही BEO आणि PDO यांनी तक्रारीनंतर बांधकाम थांबवण्याचे आदेश दिले असल्याचे बिशपांचे म्हणणे आहे. वारंवार विनंती करूनही स्थानिक पातळीवर दिलासा न मिळाल्याने त्यांनी शासनाकडे दाद मागितली.

मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि गृहमंत्री डॉ. परमेश्वर यांनी अडथळे निर्माण करणाऱ्यांवर योग्य कारवाई करण्यात येईल तसेच शांतता व कायदा-सुव्यवस्था राखत प्रकरणाला प्राधान्याने तोडगा काढला जाईल, असे आश्वासन दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!