Uncategorized
Trending

बेळगावच्या सर्वांगीण विकासासाठी सरकारने विशेष लक्ष द्या: आम. अभय पाटील 

बेलगाम प्राईड/ बेळगाव सीमावर्ती भाग असूनही गेल्या 50 वर्षांपासून सर्वच सरकारांनी या शहराकडे दुर्लक्ष केले आहे. बेळगावच्या सर्वांगीण विकासासाठी सरकारने विशेष लक्ष द्यावे, अशी मागणी बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी आज विधानसभेत करून सरकारचे लक्ष वेधले.

आज विधानसभेत बोलताना आमदार अभय पाटील म्हणाले की, बेळगाव सीमावर्ती भागात असल्याने गेल्या 50 वर्षांपासून सर्वच सरकारांनी या शहराची उपेक्षा केली आहे. ‘इंडाल’ नंतर येथे कोणतेही मोठे उद्योग आलेले नाहीत. बेळगावकडे राज्याची ‘दुसरी राजधानी’ म्हणून पाहिले जाते, पण शहरात योग्य सांडपाणी व्यवस्थापन नाही, ज्यासाठी सुमारे आठशे पन्नास कोटी रुपयांची आवश्यकता आहे. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत बेळगावला मिळालेला निधी हा 10 टक्क्यांपेक्षाही कमी आहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष असताना त्यांनी बेळगावला भेट दिली होती. या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारने निधी देऊन 300 एकर जागेवर स्वातंत्र्य संग्रामावर आधारित ‘थीम पार्क’ उभारण्यासाठी आराखडा तयार केला आहे. जिल्ह्यात गांधीजींनी भेट दिलेल्या स्थळांचा विकास सरकारने करावा, पण राज्य सरकार याकडे लक्ष देत नाही.

बेळगावात 60 हजार कामगार आहेत, त्यांच्यासाठी पाच एकर जागा निश्चित करण्याकरिता सरकारकडे प्रस्ताव सादर केला आहे. तो लवकर निश्चित करावा. बेळगावात महिलांसाठी वस्त्रोद्योग पार्क उभारणे आवश्यक आहे. तसेच, बेळगावचा बासमती तांदूळ, शहापूर साडी, बेळगावचा कुंदा, हुक्केरीचे बदनिकाय, खानापूरची काजूबी आणि संकेश्वरची मिरची यासह इतर कृषी उत्पादनांना प्रोत्साहन द्यावे.

बेळगावात फाउंड्री, संरक्षण उत्पादने, रेल्वे आणि एरोस्पेस क्षेत्रासाठी अधिक उत्पादन करण्यासाठी उद्योगांना प्रोत्साहन द्यावे. मराठा विकास प्राधिकरणासाठी तातडीने निधी जारी करावा आणि साळी समाजासाठी विकास निगम स्थापन करावा. तसेच, लष्कराच्या ताब्यात असलेली 745 एकर जमीन ताब्यात घेऊन तेथे आयटी पार्कची निर्मिती करावी. महानगरपालिकेला अधिक निधी द्यावा. बळ्ळारी नाल्याचे काँक्रिटीकरण करावे. अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाने क्रीडा संकुल उभारावे आणि ऐतिहासिक व पर्यटन स्थळांचा विकास करावा, अशी मागणी त्यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!