गॅरंटी योजनांच्या अंतर्गत उत्तर कर्नाटकसाठी 46,277 कोटी रुपये खर्च – मुख्यमंत्री सिद्धरामय्या

बेलगाम प्राईड सुवर्णसौध (दि.19)/ राज्य सरकारने पंचगॅरंटी योजनांसाठी आतापर्यंत एकूण 1,06,066 कोटी रुपये खर्च केले असून, त्यापैकी 46,277 कोटी रुपये उत्तर कर्नाटक भागासाठी खर्च करण्यात आले आहेत. अशी माहिती मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिली.
बेळगाव येथे सुरू असलेल्या विधानमंडळ अधिवेशनात उत्तर कर्नाटकाच्या विकासासंदर्भात झालेल्या चर्चेला उत्तर देताना त्यांनी हे स्पष्ट केले. सामाजिक आणि आर्थिक असमतोल दूर करण्याच्या उद्देशानेच राज्य सरकारने पंचगॅरंटी योजना राबवल्या आहेत. राज्याच्या एकूण लोकसंख्येपैकी दक्षिण कर्नाटकात 58 टक्के तर उत्तर कर्नाटकात 42 टक्के लोकसंख्या आहे. मात्र, गॅरंटी योजनांअंतर्गत 43.63 टक्के निधी उत्तर कर्नाटक भागासाठी खर्च करण्यात आला आहे. असे मुख्यमंत्री म्हणाले.
गृहलक्ष्मी योजनेअंतर्गत राज्यभरात 1 कोटी 24 लाख 12 हजार 543 लाभार्थी आहेत. यापैकी उत्तर कर्नाटकात 58 लाख 92 हजार 156 लाभार्थी या योजनेचा लाभ घेत आहेत. या योजनेसाठी राज्य सरकारने 52,400 कोटी रुपये खर्च केले असून त्यापैकी 24,631 कोटी रुपये उत्तर कर्नाटकातील लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत.
गृहज्योती योजनेअंतर्गत राज्यातील 1 कोटी 65 लाख 24 हजार 547 घरांना 200 युनिटपर्यंत मोफत वीज पुरवली जात आहे. यापैकी उत्तर कर्नाटकातील 56 लाख 70 हजार 211 घरे मोफत वीज घेत आहेत. यासाठी राज्यभरात 20,639 कोटी रुपये खर्च करण्यात आले असून त्यातील 6,038 कोटी रुपये उत्तर कर्नाटकासाठी खर्च झाले आहेत.
युवनिधी योजनेअंतर्गत, राज्यभरात 2 लाख 84 हजार 802 लाभार्थी आहेत. यापैकी उत्तर कर्नाटकात 1 लाख 73 हजार 722 बेरोजगार लाभार्थी या योजनेअंतर्गत भत्ता घेत आहेत. या योजनेसाठी राज्यात 750 कोटी रुपये खर्च झाले असून त्यापैकी 456 कोटी रुपये उत्तर कर्नाटकातील लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत.
त्याचप्रमाणे, अन्नभाग्य योजनेअंतर्गत उत्तर कर्नाटकासाठी 7,848 कोटी रुपये, तर शक्ती योजनेअंतर्गत 7,027 कोटी रुपये खर्च करण्यात आले असल्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले.




