गोवा जलतरण स्पर्धेत पीएसए जलतरणपटूंची दमदार कामगिरी
२३ पदके व २ वैयक्तिक अजिंक्यपदांची कमाई

बेलगाम प्राईड/ गोवा येथे २० व २१ डिसेंबर रोजी झालेल्या जलतरण स्पर्धेत पॅशनेट स्पोर्ट्स अकॅडमी (PSA)च्या जलतरणपटूंनी उल्लेखनीय कामगिरी करत २३ पदके तसेच २ वैयक्तिक अजिंक्यपदे जिंकून अकॅडमीचा गौरव वाढवला.
निराली हिंगमिरे हिने उत्कृष्ट कामगिरी करत वैयक्तिक अजिंक्यपद पटकावले. तिने २५ मी. फ्रीस्टाइलमध्ये कांस्य, २५ मी. बॅकस्ट्रोकमध्ये रौप्य, तर २५ मी. किकबोर्ड प्रकारात सुवर्णपदक जिंकले.
साद खाझी याने ५० मी. फ्रीस्टाइल, ५० मी. बटरफ्लाय आणि ५० मी. बॅकस्ट्रोक या तिन्ही प्रकारांत रौप्यपदकांची कमाई केली. श्रुष्टी कंग्राळकर हिने स्पर्धेत वर्चस्व गाजवत वैयक्तिक अजिंक्यपद पटकावले. तिने १०० मी. ब्रेस्टस्ट्रोक, १०० मी. आयएम, ५० मी. ब्रेस्टस्ट्रोक, ५० मी. फ्रीस्टाइल आणि ५० मी. बटरफ्लाय या पाचही प्रकारांत सुवर्णपदके जिंकली.
यश के. पाटुकले याने २५ मी. बॅकस्ट्रोकमध्ये सुवर्ण, २५ मी. फ्रीस्टाइल व २५ मी. किकबोर्डमध्ये रौप्यपदके पटकावली. ओम के. पाटुकले याने ५० मी. ब्रेस्टस्ट्रोकमध्ये कांस्य, तर ५० मी. बटरफ्लायमध्ये रौप्यपदक जिंकले. रित्वी कंग्राळकर हिने ५० मी. बॅकस्ट्रोकमध्ये कांस्यपदक मिळवले. सम्राट मलई याने २५ मी. फ्रीस्टाइल व २५ मी. किकबोर्ड प्रकारात कांस्यपदके जिंकली.सिद्धार्थ कुरुंदवाड याने १०० मी. ब्रेस्टस्ट्रोकमध्ये सुवर्ण, ५० मी. ब्रेस्टस्ट्रोकमध्ये रौप्य, तर १०० मी. फ्रीस्टाइल व १०० मी. आयएममध्ये कांस्यपदकांची कमाई केली.
या यशामागे जलतरणपटूंची सातत्यपूर्ण मेहनत, पालकांचा अखंड पाठिंबा आणि प्रशिक्षकांचा विश्वास व मार्गदर्शन कारणीभूत असल्याचे अकॅडमीकडून सांगण्यात आले. पदक न मिळवता देखील दुसऱ्या दिवशी पुन्हा सरावासाठी पूलमध्ये उतरलेल्या खेळाडूंच्या जिद्दीलाही विशेष दाद देण्यात आली.
या यशाबद्दल प्रशिक्षक श्यामसुंदर मरुतिराव मलई, तसेच मनोज जाधव, प्रशांत पाटील, सूरज मंगनकर आणि अमित चव्हाण पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच डॉ. प्रभाकर कोरे आणि डॉ. प्रीती कोरे डोडवाड यांचे सततच्या प्रोत्साहन मिळाले.




