
बेलगाम प्राईड/ कराटे क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान, कार्यक्षमता आणि सातत्यपूर्ण समर्पणाच्या जोरावर बेळगावचे जितेंद्र काकतीकर यांची कराटे इंडिया ऑर्गनायझेशनच्या राष्ट्रीय स्पोर्ट्स कमिशन सदस्यपदी निवड झाली आहे. ३ डिसेंबर २०२५ रोजी झालेल्या या अधिकृत नियुक्तीमुळे राष्ट्रीय संघटनेत स्थान मिळवणारे ते बेळगावमधील पहिले कराटेपटू ठरले असून हा क्षण शहरासाठी अभिमानाचा आहे.
दिल्लीतील टॉकाटोरा स्टेडियम येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेदरम्यान ही नियुक्ती जाहीर करण्यात आली. कराटे क्षेत्रातील त्यांची कामगिरी, संघटनेसाठी केलेले प्रयत्न व खेळाडूंना दिलेला प्रेरणादायी पुढाकार याची दखल घेऊन त्यांना या पदासाठी निवडण्यात आले.
ही निवड कराटे इंडिया ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष भारत शर्मा, सीएस अरुण मच्छैयाह, तसेच संघटनेचे प्रमुख प्रतिनिधी भार्गव रेड्डी यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आली. जितेंद्र काकतीकर यांच्या या ऐतिहासिक नियुक्तीमुळे बेळगावातील कराटे खेळाडूंना नवा उत्साह व प्रेरणा लाभणार आहे. शहरातून राष्ट्रीय पातळीवर योगदान देणाऱ्या त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.




