महामेळाव्याच्या विरोधात प्रशासनाची दडपशाही ; समिती नेत्यांची पहाटेपासून धरपकड

बेलगाम प्राईड/ कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाला प्रत्त्युत्तर देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्याच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक पोलिसांनी समितीच्या नेत्यांची पहाटेपासून धरपकड सुरू करण्यात आली. या कारवाईमुळे मराठी भाषिकानी संताप व्यक्त केला आहे.
दरवर्षीप्रमाणे म.ए.समितीने आज, सोमवारी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी व्हॅक्सिन डेपो मैदान या ठिकाणी बेळगाव येथे मराठी भाषिकांच्या वतीने महामेळाव्याचे आयोजन केले होते. मात्र, हा मेळावा होऊ नये यासाठी कायदा व सुव्यवस्थेचे कारण पुढे करून कर्नाटक सरकारने पोलिसांना हाताशी धरून आयोजनात अडथळा आणण्यास सुरुवात केली.

सकाळच्या सत्रात सुरुवातीला खानापूर तालुका समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना खानापूर पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस स्थानकात स्थानबद्ध केलं त्यानंतर हळूहळू बेळगाव शहरात देखील कारवाईला सुरुवात झाली.
मेळाव्याच्या अनुषंगाने आज पहाटेपासूनच महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांवर पाळत ठेवण्यात आली होती. त्यांच्या घरासमोर पोलिसांची वाहने थांबलेली दिसत होती. पूर्व खबरदारी म्हणून समितीचे नेते शुभम शेळके, धनंजय पाटील, मनोहर उंदरे यांच्यासह अनेकांना पोलिसांनी ताब्यात घेण्यास सुरुवात केली.

मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर व्हॅक्सिन डेपो मैदानावर काल रविवारपासूनच मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. व्हॅक्सिन डेपो मैदानाकडे जाणारे टिळकवाडीतील अगरकर रोड, रानडे रोड, रॉय रोड, तसेच दुसऱ्या रेल्वे गेटकडून जाणारा रस्ताच्या ठिकाणी सर्व रस्ते बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आले होते. आज सोमवारी तर व्हॅक्सिन डेपो मैदान आणि परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.

कर्नाटक पोलिसांच्या दहशतीला भीक न घालता आज सकाळी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर, रमाकांत कोंडुस्कर ,माजी नगरसेवक नेताजी जाधव, शुभम शेळके, माजी उपमहापौर संजय शिंदे, धनंजय पाटील, राजू किणेकर, रणजीत चव्हाण पाटील यांच्या नेतृत्वाखाली समिती कार्यकर्त्यांनी व्हॅक्सिन डेपो मैदानाकडे कूच केली.

पोलिसांनी त्यांना मैदानात प्रवेश करण्यापासून रोखल्यामुळे दोन्ही बाजूंमध्ये मोठी शाब्दिक चकमक उडाली. यावेळी समिती कार्यकर्त्यांनी “बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे” अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. पोलिसांनी कायद्याचे कारण दिले, तर समिती नेत्यांनी लोकशाहीने दिलेल्या अधिकाराचा दाखला देत शांततेत निषेध करण्याची विनंती केली. मात्र, पोलिसांनी समितीच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन पोलीस वाहनातून एपीएमसी पोलीस स्थानकात स्थानबद्दल करून काही वेळानंतर सुटका केली.
मराठी भाषकांना लोकशाहीने दिलेल्या व्यक्ती स्वातंत्र्यावर आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याच्या हक्कावर गदा आणली जात असल्यामुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.




