
बेलगाम प्राईड / मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरतर्फे सहाव्या अग्निवीर तुकडीचा शपथविधी भव्य पद्धतीने पार पडला. तब्बल ३१ आठवड्यांच्या कठोर सैनिकी प्रशिक्षणाची सांगता करत ४८४ अग्निवीरांनी राष्ट्रसेवेची शपथ घेतली. या शपथविधी परेडचे निरीक्षण मेजर जनरल हरी भास्करन पिल्लई, एडीजी रिक्रुटिंग (स्टेट्स) यांनी केले. युवा सैनिकांच्या शिस्तबद्ध संचलनाबद्दल त्यांनी मन:पूर्वक कौतुक केले.
राष्ट्रीय ध्वज, रेजिमेंटल ध्वज आणि पवित्र धर्मग्रंथांच्या साक्षीने अग्निवीरांनी देशसेवेची शपथ घेतली. या प्रसंगी त्यांच्या पालकांसह माजी सैनिक, मान्यवर, एनसीसी कॅडेट्स आणि विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती होती. अग्निवीर पवन यल्लाकुरी यांनी परेडचे नेतृत्व केले.

उत्कृष्ट प्रशिक्षणाचा प्रत्यय देणाऱ्या या परेडमध्ये गुणांकनात आघाडी घेतलेल्या अग्निवीरांना सन्मान चिन्हे प्रदान करण्यात आली. अग्निवीर सूरज मोरे याला ‘नाईक यशवंत घाटगे, व्हीसी पदक’ हा सर्वोच्च सन्मान मिळाला. कार्यक्रमाची सांगता युद्धस्मारकावर शहीदांना अभिवादन करून आणि पालकांना गौरव पदक प्रदान करून झाली.




