
बेलगाम प्राईड/नेसरी- सांबरे (ता. गडहिंग्लज) येथे एका धार्मिक कार्यक्रमानिमित्त आयोजित महाप्रसादाच्या माध्यमातून ३०० हून अधिक जणांना विषबाधा होण्याची घटना आज (शुक्रवारी) दुपारी घडली. यामध्ये ४० हून अधिक लहान मुलांचा समावेश आहे.
या सर्वांना जुलाब व मळमळण्याचा त्रास सुरू झाला. दरम्यान, ही घटना समजताच गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यातील आरोग्य यंत्रणा उपचारासाठी सज्ज झाली आहे. या रूग्णांमध्ये सांबरे, काळामवाडी, यमेहट्टी, तावरेवाडी या गावांतील ग्रामस्थांचा अधिक समावेश आहे. येथील ग्रामीण रूग्णालय, कानडेवाडी, मुंगूरवाडी, अडकूर, माणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि गडहिंग्लजच्या उपजिल्हा रूग्णालयात रूग्णांवर वेळेत उपचार सुरू झाल्याने सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकिय अधिकाऱ्यांनी सांगितले.

आज सकाळी सांबरे येथे एका धार्मिक कार्यक्रमानिमित्त महाप्रसादाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात परिसरातील दहा ते बारा खेड्यांमधील ग्रामस्थ सहभागी झाले होते. प्राथमिक अंदाजवरून साधारण ३०० हून ग्रामस्थ बाधित झाले असून, त्यात महिला, पुरूष, लहान मुले, ज्येष्ठ नागिरकांचाही समावेश आहे.
दरम्यान, सांबरेसह इतर गावांतील ग्रामस्थांनाही त्रास जाणवू लागल्याने नातेवाईक हॉस्पिटलकडे धाव घेवू लागले. याची व्याप्ती वाढू लागली तशी आरोग्य यंत्रणेची तारांबळ उडू लागली. भागातील आरोग्य केंद्राच्या सर्व रूग्णवाहिकेसह मिळेल त्या वाहनांमधून रूग्णांना ग्रामीण रुग्णालयासह शेजारच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रूग्णालयात पाठविण्यात येत होते. त्याचबरोबर बेळगाव केएलई रुग्णालयातील रुग्णवाहिका देखील या रुग्णांच्या उपचारासाठी पाठविण्यात आल्या होत्या तसेच केएलई रुग्णालयात पूर्व तयारी करून ठेवण्यात आली होती. रूग्णांवरील उपचारासाठी गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यातील डॉक्टर्स व इतर कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले. काही आरोग्य कर्मचारी गावात भेटी देवून घरोघरी तपासणी सुरू केली आहे. नेसरी ग्रामीण रूग्णालयाला आवश्यक औषधाचा पुरवठा गडहिंग्लजहून मागविण्यात आला होता.

भांबावलेले नातेवाईक...
या रूग्णांमध्ये लहान मुलांची संख्याही मोठी आहे. त्या सर्वांना गडहिंग्लजच्या उपजिल्हा रूग्णालयातील खास साथ-रोगसाठी उभारलेल्या हॉस्पीटलमध्ये दाखल करून तत्काळ औषधोपचार सुरू केले. यावेळी मुलांचे नातेवाईक भांबावलेले दिसून आले. त्यांच्या चेहऱ्यावर एकप्रकारची भिती दिसली. डॉक्टर, नर्सेस व सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांना धीर देत होते. ज्येष्ठ नागरिक रूग्णांचे नातेवाईकही याच अवस्थेत होते. ज्या दवाखान्यांमध्ये रूग्णांवर उपचार सुरू होते, त्याठिकाणी नातेवाईकांची गर्दी मोठी होती.
बाधित वाढण्याची शक्यता
दरम्यान, दोन हजार लोकांसाठी हा महाप्रसाद होता. त्यात शेजारच्या गावातील भाविकांचा अधिक समावेश होता. सकाळच्या टप्प्यात महाप्रसाद घेतलेल्या ग्रामस्थांना त्रास झाला नसल्याचे कळते. परंतु, दुपारनंतर महाप्रसाद घेतलेल्यांना काही वेळांनी उलट्या, पोटदुखी, मळमळणे, जुलाब असा त्रास जाणवू लागला. दुपारच्या दरम्यान बटाट्याची भाजी आंबल्याने ही परिस्थिती उद्भवल्याचीही चर्चा सुरू होती. परंतु, प्रत्यक्ष अन्नाची तपासणी झाल्यानंतरच मूळ कारण समजणार असल्याचे सांगण्यात आले. प्राथमिक अंदाज ३०० जणांना विषबाधा झाल्याचे सांगण्यात येत असले तरी दहा ते बारा गावांतील आणखीन रुग्ण वाढण्याची शक्यताही नाकारता येत नाही, असे सांगण्यात आले.




