
बेलगाम प्राईड / चिकोडी लोकसभा मतदारसंघातील खासदार प्रियांका जारकीहोळी यांच्याकडून गुणवंत विद्यार्थिनींना ‘दिल्लीवारी’चे एक खास शैक्षणिक प्रोत्साहन मिळाले आहे. खासदार जारकीहोळी यांनी चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यातील निवडक शाळा-महाविद्यालयांमधील १५ गुणवंत विद्यार्थिनींना स्वतःच्या खर्चातून विमानाने नवी दिल्लीला घेऊन गेल्या आहेत. या विद्यार्थिनींना थेट संसदेचे हिवाळी अधिवेशन पाहण्याची अनोखी संधी मिळणार आहे.
२०२४-२५ मध्ये एसएसएलसी आणि पीयूसी द्वितीय वर्षाच्या परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळवलेल्या १५ टॉपर विद्यार्थिनींची या ऐतिहासिक दौऱ्यासाठी निवड करण्यात आली आहे. आज सांबरा विमानतळावरून खासदार जारकीहोळी या सर्व विद्यार्थिनींसमवेत दिल्लीकडे प्रस्थान केले.
खासदार जारकीहोळी यांनी सांगितले की, बेळगाव येथे सुरू असलेले विधिमंडळाचे अधिवेशन पाहण्याची संधी मिळाल्यानंतर आता या विद्यार्थिनींना संसदेचे कामकाजही पाहता यावे, या उद्देशाने त्यांना नवी दिल्लीला घेऊन जात आहोत.
खासदार प्रियांका जारकीहोळी यांनी स्वखर्चातून हा शैक्षणिक दौरा आयोजित केल्यामुळे विद्यार्थी वर्गाला एक अनोखी संधी प्राप्त झाली असून, गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणाऱ्या त्यांच्या या निर्णयाचे शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात सर्वत्र कौतुक होत आहे.




