
बेलगाम प्राईड/ सुवर्ण गार्डन परिसरात विविध मागण्या पूर्ण करण्याची मागणी करत सुरू असलेल्या भव्य आंदोलनादरम्यान रायबाग तालुक्यातील कुडची गावातील शेतकरी यल्लप्पा हिरेकुरबर (३५) हा युवक अचानक अस्वस्थ झाल्याची घटना बुधवारी सकाळी घडली.
आंदोलनस्थळी मोठी गर्दी, प्रचंड दडपण, दीर्घकाळ घोषणाबाजी चालू असताना शेतकऱ्यांना बीपी/रक्तदाब आणि साखरेतील चढउताराचा संशय येऊन चक्कर येत तो खाली कोसळला. तत्काळ तेथे उपस्थित असलेल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी प्रथमोपचार देऊन त्यांना बेळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या घटने नंतर काही क्षण आंदोलनस्थळी गोंधळ आणि चिंता निर्माण झाली. मात्र नंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. सहकारी शेतकरी, आयोजक आणि पोलिसांनी तात्काळ आवश्यक मदत केली. मागण्यांना अद्याप स्पष्ट तोडगा निघाला नसल्याने आंदोलन तीव्र होत असून शेतकऱ्यांवर मानसिक आणि शारीरिक ताण वाढत असल्याचे आयोजकांनी सांगितले.
यल्लप्पा हिरेकुरबर यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती रुग्णालयीन सूत्रांनी दिली आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांचे तातडीने मूल्यांकन करून सरकारने पावले उचलावीत, अशी मागणी आंदोलनात सातत्याने व्यक्त होत आहे.




