विनापरवाना दारूची वाहतूक साडेतीन लाखाची दारू जप्त अबकारी खात्याची कारवाई

बेलगाम प्राईड/ गोवा बनावटीची दारू बेकायदेशीररित्या बेळगाव शहरात आणणाऱ्या एका चालकाला उत्पादन शुल्क विभागाने रंगेहाथ पकडले. पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वरील सर्व्हिस रोडवर ही कारवाई करण्यात आली असून, यामध्ये दारूसह चारचाकी वाहन जप्त करण्यात आले आहे.
उत्पादन शुल्क विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली, अबकारी विभागाचे निरीक्षक बेळगाव परिक्षेत्र क्रमांक ३ आणि त्यांच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे यडियुरप्पा मार्गावर सापळा रचून धाड घालण्यात आली.
या कारवाईत मंजुनाथ मल्लगौडा गिडगेरी (वय २६, रा. महाद्वार रोड, या चालकाला जीए-०९ ए-३८१० क्रमांकाच्या स्विफ्ट कारमधून विनापरवाना दारूची वाहतूक करताना पकडून ताब्यात घेण्यात आले. त्याच्या कारमधून गोवा राज्यात विक्रीसाठी नमूद केलेली विविध प्रकारची एकूण १३८.०६० लिटर दारू कोणताही कायदेशीर परवाना नसताना अवैध विक्रीच्या उद्देशाने वाहतूक केली जात होती. अबकारी विभागाने ही संपूर्ण दारू जप्त केली असून जप्त केलेला दारूचा साठा आणि स्विफ्ट कारची एकूण किंमत रुपये ३ लाख ४५ हजार २०० इतकी आहे.
आरोपी चालक मंजुनाथ गिडगेरी याच्यावर कर्नाटक अबकारी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास चालू ठेवण्यात आला असून या अवैध वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या स्विफ्ट कारच्या मालकाचा शोध घेतला जात आहे




