Uncategorized
Trending

बेळगाव येथून इंडिगोच्या नव्या विमानसेसाठी खास. जगदीश शेट्टर यांचा पाठपुरावा

बेलगाम प्राईड/ बेळगाव विमानतळावरून मुंबई, चेन्नई, पुणे व सुरत या प्रमुख शहरांसाठी इंडिगो एअरलाईन्सची थेट विमानसेवा सुरू व्हावी, यासाठी बेळगावचे खासदार तथा कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी पुढाकार घेतला आहे. या संदर्भात त्यांनी इंडिगो (इंटरग्लोब एव्हिएशन लिमिटेड)चे भारतातील विक्री प्रमुख अंशुल सेठी यांना अधिकृत पत्र पाठवून तातडीने सेवा सुरू करण्याची मागणी केली आहे.

पत्रात खासदार शेट्टर यांनी नमूद केले आहे की, बेळगाव विमानतळ हे कर्नाटकातील सर्वात जुने विमानतळांपैकी एक असून स्वातंत्र्यपूर्व काळापासून कार्यरत आहे. उत्तर कर्नाटकातील मध्यवर्ती शहर म्हणून बेळगावचे शैक्षणिक, औद्योगिक व आरोग्य क्षेत्रात मोठे महत्त्व आहे. येथे विश्वेश्वरय्या तंत्रज्ञान विद्यापीठ (VTU), राणी चन्नम्मा विद्यापीठ, अनेक अभियांत्रिकी महाविद्यालये, वैद्यकीय व दंत महाविद्यालये तसेच केएलईसारखे नामांकित रुग्णालय आहे.

सध्या बेळगावहून नवी दिल्ली, हैदराबाद, अहमदाबाद व बेंगळुरू या मार्गांवर इंडिगोच्या विमानसेवा सुरू असून या सर्व मार्गांना चांगला प्रवासी प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे मुंबई, चेन्नई, पुणे व सुरत हे मार्गही व्यावसायिकदृष्ट्या पूर्णपणे व्यवहार्य ठरतील, असा विश्वास शेट्टर यांनी व्यक्त केला आहे.

स्थानिक उद्योगपती, डॉक्टर, वकील, अभियंते, वास्तुविशारद व बांधकाम व्यावसायिकांकडूनही या नव्या विमानसेवांसाठी सातत्याने मागणी होत असल्याचे त्यांनी पत्रात स्पष्ट केले आहे. इंडिगोने लवकरात लवकर या शहरांसाठी थेट उड्डाण सेवा सुरू कराव्यात, अशी जोरदार विनंती खासदार जगदीश शेट्टर यांनी केली आहे.

बेळगावच्या विकासाच्या दृष्टीने ही विमानसेवा अत्यंत महत्त्वाची ठरणार असून, व्यापार, उद्योग, शिक्षण व आरोग्य क्षेत्राला मोठी चालना मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!