
बेलगाम प्राईड/ सदगुरु श्री वामनराव पै प्रणित जीवनविद्या मिशन या संस्थेच्या वतीने नववर्षाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.प्रभाकर कोरे हॉस्पिटल रक्तपेढीच्या सहकार्याने शहापूर कोरे गल्ली येथील गंगापुरी मठ या ठिकाणी रक्तदान शिबिर संपन्न झाले.यावेळी 80 रक्तदात्यांनी रक्तदान करून आपली सामाजिक जबाबदारी पार पाडली.
या रक्तदान शिबिराचे उद्घाटन जीवनविद्या मिशनचे प्रबोधक शंकर बांदकर, ज्येष्ठ सल्लागार प्रभाकर देसाई,शाखेचे अध्यक्ष शैलेश शिरोडकर,खजिनदार दीपक बिर्जे, सचिव सतीश बेकवाडकर,अंतर्गत हिशोब तपासणीस तानाजी पाटील, अरविंद अष्टेकर,अवधूत सामंत त्याचबरोबर प्रभाकर कोरे हॉस्पिटलचे डॉ. माधव प्रभू, रक्तपेढीचे प्रमुख डॉ.विर्गे, हॉस्पिटलचा कर्मचारी वर्ग जीवनविद्या मिशनचे नामधारक व कोरे गल्ली पंच कमिटी सदस्य यांच्या उपस्थितीत पार पडला.
डॉ.माधव प्रभू यांची प्रभाकर कोरे हॉस्पिटलच्या संचालक पदी निवड झाल्याने जीवनविद्या मिशनच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. त्याचबरोबर कोरे गल्ली पंच कमिटीच्या वतीने हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यासाठी विनामूल्य सभागृह उपलब्ध करून देण्यात आला त्याबद्दल त्यांचेही आभार मानण्यात आले.
यावेळी डॉ. माधव प्रभू यांनी उपस्थितांना रक्तदानाचे महत्व सांगून रक्तदान करण्याबद्दल आवाहन केले. शंकर बांदकर यांनी जीवनविद्या मिशनच्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती देऊन जीवनविद्या मिशन दर वर्षी रक्तदान शिबीर आयोजित करून अनेकांना मदतीचा हात देऊन सामाजिक बांधिलकी जपत असल्याची माहिती दिली.अध्यक्ष शैलेश शिरोडकर यांनी रक्तदान शिबिरासाठी सहकार्य करणाऱ्या डॉक्टर्स, नर्स व रक्तदात्यांचे आभार व्यक्त केले.




