
बेलगाम प्राईड/ बेळगावीच्या पत्रकारितेच्या विश्वातील परिचित आणि आदरणीय नाव असलेले ज्येष्ठ पत्रकार एम. एन. पाटील (वय 71)यांचे सोमवारी रात्री उशिरा तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले तसेच मोठा नातेवाईक, मित्र आणि सहकाऱ्यांचा परिवार आहे.
श्री. पाटील यांची पत्रकारितेतील कारकीर्द दीर्घ आणि गौरवशाली होती. त्यांनी आपल्या व्यावसायिक प्रवासाची सुरुवात युनायटेड न्यूज ऑफ इंडिया (UNI) चे वार्ताहर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी डेक्कन हेराल्डमध्ये उल्लेखनीय सेवा बजावली. तसेच बेळगावस्थित कन्नड दैनिक लोकदर्शनमध्ये त्यांनी प्रदीर्घ काळ काम केले. समतोल वृत्तांकन, प्रामाणिकपणा आणि प्रादेशिक प्रश्नांची सखोल जाण यासाठी ते ओळखले जात होते.
पत्रकारितेतील नैतिकतेबाबतची त्यांची शांत पण ठाम बांधिलकी आणि तरुण पत्रकारांचे मार्गदर्शन यामुळे ते विशेष मानले जात होते. व्यावसायिक काटेकोरपणा आणि वैयक्तिक नम्रता यांचा सुरेख संगम त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होता.त्यांच्यावर आज (मंगळवारी) सायंकाळी ४ वाजता सदाशिवनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
बेळगावातील पत्रकार बांधवांनी त्यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले असून, त्यांना तत्त्वनिष्ठ पत्रकार आणि आपुलकीचा सहकारी म्हणून श्रद्धांजली अर्पण केली आहे तसेच दिवंगत आत्म्यास चिरशांती लाभो, अशी प्रार्थना केली आहे.



