
बेलगाम प्राईड / बेळगाव मधील सर्व बातम्यांमधून प्रसिद्ध झालेला सीसीटीव्ही दृश्यांबाबत कारागृह उत्तर विभागीय डीआयजी टी. पी. शेषा यांनी महत्त्वाचे स्पष्टीकरण पत्रकारांसमोर दिले आहे. सर्व बातम्यांमधून प्रसिद्ध झालेला व्हिडिओ सुमारे एक महिना पूर्वीचा जुना असून याप्रकरणी यापूर्वीच गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
गुरुवारी बेळगाव येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की या प्रकरणाचा तपास बेळगाव ग्रामीण पोलीस करत आहेत. प्राथमिक पाहणीत हे सीसीटीव्ही फुटेज कारागृहातील कर्मचाऱ्यांनीच उपलब्ध करून दिल्याचे दिसून येत आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश पोलीस महासंचालकांनी दिले असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
याचवेळी सीआयएसएफ जवानांच्या भूमिकेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. जवानांची वर्तणूक प्राथमिकदृष्ट्या बेजबाबदारपणाची असल्याचे दिसून येत आहे, असे डीआयजी टी. पी. शेषा यांनी स्पष्ट केले.
महासंचालकांच्या सूचनेनुसार परवा कारागृहात मोठी तपासणी मोहीम राबवण्यात आली. या कारवाईत १२ मोबाईल फोन, एक चार्जर आणि चार सिमकार्ड जप्त करण्यात आले आहेत.उत्तर विभागाच्या कार्यक्षेत्रातील विविध कारागृहांमधून आतापर्यंत एकूण ३४ मोबाईल फोन जप्त करण्यात आल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.




