खादरवाडीतील रस्त्याच्या कामासाठी गावकऱ्यांचे सरकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

बेलगाम प्राईड / खादरवाडी (ता. जि. बेळगाव) येथील प्रमुख रस्त्याचे प्रलंबित असलेले विकास काम युद्धपातळीवर पूर्ण करावे, या मागणीसाठी शेतकरी संघटना व श्रीराम सेना हिंदुस्थानचे प्रमुख कार्यकर्ते राजू पाटील यांनी आजपासून बेमुदत उपोषण सुरू केले असून त्यांना पाठिंबा देताना गावकरी व शेतकऱ्यांनीही या ठिकाणी धरणे आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
क्लब रोड, बेळगाव येथील कर्नाटक ग्रामीण रस्ते विकास खात्याच्या कार्यालयासमोर राजू पाटील व खादरवाडीतील सामाजिक कार्यकर्ते राकेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन छेडण्यात आले आहे. आंदोलन स्थळी बेलगाम प्राईडला माहिती देताना राकेश पाटील यांनी सांगितले की कर्नाटक ग्रामीण रस्ते विकास खात्याकडून मंजूर झालेला आमच्या खादरवाडी गावातील प्रमुख रस्त्याचे विकास काम त्वरेने पूर्ण केले जावे यासाठी आम्ही गेल्या वर्षभरापासून पाठपुरावा करत आहोत. यादरम्यान वेळोवेळी अधिकाऱ्यांनी रस्त्याचे काम तातडीने पूर्ण केले जाईल असे आश्वासन दिले असले तरी अद्यापपर्यंत त्याची पूर्तता झालेली नाही.
रस्त्याची दुरावस्था झाली आहे. वेळोवेळी आम्ही संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेतली असता त्यांनी उद्या बुधवारी कोणत्याही परिस्थितीत तुमच्या रस्त्याचे काम हाती घेतले जाईल असे आश्वासन दिले होते.
तथापि काल देखील काम सुरू न झाल्यामुळे आम्ही गावातील नागरिक व शेतकरी आज गुरुवारी शेतकरी संघटना व श्रीराम सेना हिंदुस्थानचे प्रमुख कार्यकर्ते राजू पाटील यांच्या नेतृत्वाखाली धरणे सत्याग्रह सुरू केले आहे. खुद्द राजू पाटील यांनी रस्त्याचे काम त्वरित हाती घेतले जावे यासाठी बेमुदत उपोषण सुरू केले.
सदर रस्ता अतिशय महत्त्वाचा असून हा रस्ता ओलांडला की दोन शाळा आहेत. तसेच हा रस्ता वेंगुर्ला महामार्गाला जोडला गेला असल्यामुळे या रस्त्यावर वाहनांची सतत वर्दळ असते. सध्याच्या खराब रस्त्यामुळे अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.
त्यामुळे शाळकरी मुलांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. परवाच घडलेल्या एका अपघातात दैव बलवत्तर म्हणून शाळकरी मुलांचा जीव वाचला आहे. तेंव्हा सदर रस्त्याचे विकास काम युद्धपातळीवर हाती घेऊन पूर्ण केले जावे, यासाठी आम्ही गावकरी राजू यांना पाठिंबा देऊन आज हे आंदोलन करत आहोत. तसेच जोपर्यंत रस्त्याचे काम हाती घेतले जात नाही तोपर्यंत तुमचे हे आंदोलन सुरूच राहणार आहे.
आम्ही बेंगलोर येथील संबंधित प्रमुख सरकारी कार्यालयाकडे देखील सदर रस्त्यासंबंधीची कागदपत्रे पाठवली होती. त्यांनी तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी देखील रस्त्याचे विकास काम पूर्ण करण्याचा आदेश दिला आहे. मात्र तरीही रस्त्याचे काम हाती घेतले जात नाही याचा अर्थ एक तर जाणून-बुजून याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
किंवा कोणाच्या तरी दबावामुळे रस्त्याचे काम हाती घेणे टाळले जात आहे, अशी शंका आम्हा गावकऱ्यांना येऊ लागली आहे. असे सांगून प्रशासनाने आमच्या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन रस्त्याच्या कामाला त्वरित सुरुवात करावी आणि राजू पाटील यांना उपोषण मागे घेण्यास सहकार्य करावे. अन्यथा याचे गंभीर परिणाम होतील, असा इशारा राकेश पाटील यांनी शेवटी दिला.




