मराठा मंडळ जिजामाता हायस्कूलमध्ये राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

बेलगाम प्राईड/ मराठा मंडळ जिजामाता हायस्कूल येथे राजमाता जिजाऊ तसेच थोर समाजसुधारिका सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात व दिमाखात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमास मराठा मंडळ हायस्कूलचे श्री. एम. के. पाटील, मराठा मंडळ सेंट्रल हायस्कूलचे श्री. बी. एम. पाटील तसेच मराठा मंडळ जिजामाता हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. एन. डी. पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात राजेशाही थाटात करण्यात आली. लेझीम, ढोल-ताशा पथकाच्या गजरात घोड्यावरून जिजाऊंचे आगमन झाले. विद्यार्थिनींनी आपल्या संस्कृती व परंपरेचे जतन करत पाळणा गीत गाऊन जिजाऊंना मानवंदना दिली.
प्रत्येक दिवसाचे स्वतःचे असे एक महत्त्व असते. ३ जानेवारी हा सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस असून, या औचित्याने बाल विद्यार्थिनींनी स्त्रीच्या विविध रूपांचे दर्शन घडविले. स्त्री ही समाजाचा कणा असून तिच्यावरच जगाची मोठी जबाबदारी निसर्गाने सोपवली आहे, हे प्रभावी सादरीकरणातून अधोरेखित करण्यात आले.
यावेळी विद्यार्थिनींनी सादर केलेली बहारदार नृत्ये तसेच अंगावर शहारे आणणारे पोवाडे उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते. त्यांच्या सादरीकरणास प्रेक्षकांकडून जोरदार दाद मिळाली.




