राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत सुनीधी, समृद्धी, वेदांत व अमन या जलतरणपटूंचे घवघवीत यश

बेलगाम प्राईड/ स्विमर्स क्लब बेळगाव व अक्वेरियस स्विम क्लब बेळगावच्या जलतरणपटूंनी नुकत्याच पार पडलेल्या ६९व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा व खेळ स्पर्धेत दैदीप्यमान कामगिरी करत देशपातळीवर बेळगावचे नाव उज्ज्वल केले. शालेय क्रीडा महासंघ, भारत (School Games Federation of India) यांच्या वतीने आयोजित ही स्पर्धा मुलांसाठी २९ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर २०२५, तर मुलींसाठी १२ ते १७ डिसेंबर २०२५ या कालावधीत दिल्ली येथे पार पडली.
या स्पर्धेत स्विमर्स क्लब बेळगावच्या सुनीधी, समृद्धी, वेदांत व अमन यांनी उत्कृष्ट जलतरण कौशल्याचे दर्शन घडवत पदकांची लयलूट केली. क्लबने एकूण ९ पदके पटकावली असून त्यामध्ये ४ सुवर्ण, ३ रौप्य व २ कांस्य पदकांचा समावेश आहे. त्यांच्या या यशामुळे बेळगावच्या क्रीडाविश्वात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून खेळाडू, प्रशिक्षक व पालकांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.




