
बेलगाम प्राईड / रोटरी क्लब ऑफ बेळगाव साऊथच्या वतीने आपल्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल अनिल गवी यांना प्रतिष्ठित ‘व्होकेशनल सर्व्हिस अवॉर्ड’ देऊन सन्मानित करण्यात आले असून त्यांच्या सामाजिक योगदानाचा रोटरी परिवारातर्फे गौरव करण्यात आला आहे.
रोटरी क्लब ऑफ बेळगाव साऊथच्या वतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून उद्यमनगर येथील पाय कन्व्हेन्शन हॉलमध्ये एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अनिल गवी यांनी आपल्या व्यवसायाप्रती दाखवलेली निष्ठा आणि समाजाच्या कल्याणासाठी दिलेले योगदान हे रोटरीच्या ‘स्वतःपेक्षा सेवा श्रेष्ठ’ या तत्त्वाचे उत्तम उदाहरण असल्याचे रोटरी क्लबने म्हटले आहे. त्यांच्या कार्यामुळे अनेकांचे जीवन समृद्ध झाले असून समाजासमोर एक नवा आदर्श निर्माण झाला आहे, अशा शब्दांत त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ बेळगाव साऊथचे अध्यक्ष रोटरीयन डॉ. गोविंद मिसाळे आणि सचिव रोटरीयन प्रणव पित्रे यांच्या उपस्थितीत अनिल गवी यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.या सोहळ्याला रोटरी क्लबचे पदाधिकारी, सदस्य आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.




