
बेलगाम प्राईड/ कोर्टातून वाहन जप्तीचा संदेश येईपर्यंत अधिकारी काय करतात? एक कोटीपर्यंत भरपाई थकीत असल्याची माहिती..
बैलहोंगल तालुक्यातील कुलवळी ग्राम पंचायत हद्दीत येणाऱ्या बसरीकट्टी गावातील महेंद्र रावसाब देसाई यांच्या एकूण 21 एक्कर जमिनीतील 5 एक्कर 8 गुंठे जमीन 1987 साली जिल्हा पंचायतीने घेतली त्यामध्ये ग्राम पंचायत इमारत, तर उर्वरित जागेमध्ये प्लॉट पाडवून जनता घरे उभारली शिवाय आरोग्य केंद्रही उभारण्यात आली आहेत. त्याकाळापासून त्याची अद्याप भरपाई मिळाली नाही. कोर्ट आदेशाप्रमाणे एकरी 4 लाख देण्याचा न्यायालयाचा आदेश आहे, त्यानुसार व्याजासहित 90 लाखाहून अधिक भरपाई देणे बंधनकारक असल्याचे या प्रकरणातील वकील ॲड.रमेश मिसाळे यांनी बेलगाम प्राईड शी बोलताना ही माहिती दिली. त्यामुळे हे प्रकरण बैलहोंगल कोर्टमध्ये सुरू होते.
नुकताच या प्रकरणाचा निकाल लागला असून, कोर्टाने जिल्हा पंचायत सबंधित संपती जप्तीचा आदेश दिला आहे. त्यानुसार याआधी जिल्हा पंचायत मधील अध्यक्ष उपाध्यक्षांची अशी सबंधित दोन वाहने जप्त करण्यात आली आहेत तर आज गुरुवार दि.8 रोजी जिल्हा पंचायत सीईओ यांचे वाहन जप्त केले आहे. जिल्हा पंचायतने पुढच्या हेरिंग पर्यंत थांबा अशी विनंती करण्यात आली मात्र यावेळी वकिलांनी त्यांची कोणतीही गोष्ट ऐकून घेतली नाही.
…..काय आहे हे प्रकरण…
बैलहोंगल तालुका (जिल्हा बेळगांव) येथील कुलवळी ग्राम पंचायत कार्यक्षेत्रात येणाऱ्या बसरीकट्टी गावामधील महेंद्र रावसाब देसाई यांच्या भाऊबंदकीच्या मालकीच्या 4 सर्वे क्रमांक मधील एकूण 21 एक्करमधील 5 एक्कर 8 गुंठे जमीन जिल्हा पंचायतीने अतिक्रमित केली आहे. तर उर्वरित जागेमध्ये रस्ते, जनता घरे बांधून दिली आहेत, शिवाय त्याच जागेमध्ये शाळा, आरोग्य केंद्र, ग्राउंडची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामध्ये सध्या जिल्हा पंचायतीने 5 एक्कर 8 गुंठे ही जागा हायकोर्टच्या सल्ल्यानुसार अतिक्रमण केली आहे. तर उर्वरित जागेत घरे, आरोग्य केंद्र, ग्राउंड, शाळा उभारली आहे. त्यामुळे 5 एक्कर 8 गुंठे जागेची एकरी 4 लाख व व्याजासहित 90 लाखाहून अधिक भरपाई देण्याचा आदेश बैलहोंगल कोर्टाने बजावला आहे. 1887 साली ही जागा जिल्हा पंचायतीने घेतली आहे, 1989 साली कोर्ट केस दाखल करण्यात आली, त्यानंतर 1993 साली पदावर असलेल्या सीईओनी भरपाई देण्याची हमी दिली होती. मात्र त्यानंतर नुसताच आश्वासनांनवर वेळ मारून आणण्यात आली आहे. याआधी अध्यक्ष उपाध्यक्ष यांची अशी दोन वाहने जप्त केली असून आज जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे वाहन जप्त करण्यात आले, न्याय मिळेपर्यंत आमचा लढा सुरूच राहिल असे देसाई यांनी सांगितले.
याआधी जिल्हाधिकारी, महानगर पालिका आयुक्तांचे वाहन जप्त झाले होते…
जिल्ह्याला अशा घटना नवीन नाहीत, याआधी जिल्हाधिकारी, महानगरपालिक आयुक्तांचे वाहन जप्त करण्यात आले होते, आणि आता जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे वाहन जप्त करण्यात आले आहे. वाहने जप्त होईपर्यंत हे अधिकारी काय करतात असा प्रश्न सामान्य नागरिकातून उपस्थित केला जात आहे.




