
बेळगाव प्राईड / न्यायालयाच्या आदेशाला एक वर्ष उलटून गेले तरीही शेतकऱ्यांची भूसंपादन केलेली जमीन आणि सुमारे 90 लाख रुपयांहून अधिकची भरपाई न दिल्याप्रकरणी बेळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांची शासकीय कार न्यायालयाच्या आदेशानुसार गुरुवारी जप्त करण्यात आली.
बैलहोंगल तालुक्यातील कुलवळी गावात शेतकऱ्यांची सुमारे 21 एकर जमीन शासनाने अतिरिक्त भूसंपादन करून घेतली होती. या जमिनीवर कुलवळी ते कत्रिदड्डी गाव दरम्यान विविध शासकीय कार्यालये पशुसंवर्धन विभाग आदी कार्यालये उभारण्यात आली असून 1992-93 पर्यंत मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. मात्र जमीन गमावलेल्या शेतकऱ्यांना अद्याप भरपाई देण्यात आलेली नव्हती
जमीन गमावलेल्या शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेतल्यानंतर बैलहोंगल न्यायालयाने प्रति एकर चार लाख रुपये भरपाई देण्याचा आदेश दिला होता. हा आदेश होऊन सहा वर्षे उलटून गेली तरीही अद्याप भरपाई न दिल्याने यापूर्वी जिल्हा पंचायत अध्यक्ष उपाध्यक्षांची वाहने जप्त केली होती. यानंतर परत एकदा न्यायालयाने जिल्हा परिषदेच्या सीईओंची शासकीय कार कार्यालयातील संगणक तसेच इतर साहित्य जप्त केले जाईल, अशी माहिती सरकारी वकील मिसाळे यांनी दिली.
संत्रस्त शेतकरी महेंद्र रावसाहेब देसाई यांनी सांगितले की, सन 1989 मध्ये 21 एकर जमीन भूसंपादन करण्यात आली होती. यापैकी 5 एकर जमिनीकरिता भरपाई देण्याचा न्यायालयाचा स्पष्ट आदेश आहे, असेही त्यांनी नमूद केले.




