
बेलगाम प्राईड/ कंग्राळी खुर्द येथील एका मोटरसायकल चोरी प्रकरणी दोघा दुचाकी चोरट्यांना अटक करून त्यांच्या जवळील 5 लाख 35 हजार रुपये किमतीच्या 13 मोटरसायकली जप्त केल्याची कारवाई एपीएमसी पोलिसांनी केली
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे उमेश हणमंत बागेवाडी (वय 33) रा.घटप्रभा रोड, बेल्लद बागेवाडी ता. हुक्केरी जि. बेळगाव आणि मौला हसनसाब हलकर्णी (वय 48) रा.गुडस ता. हुक्केरी जि.बेळगाव अशी आहेत. या प्रकरणाची थोडक्यात माहिती अशी की दुसरा क्रॉस, रामनगर, कंग्राळी खुर्द बेळगाव येथील दीपक गंगाधर भागानावर यांनी आपल्या हिरो स्प्लेंडर प्लस मोटरसायकल चोरीस गेल्याची तक्रार एपीएमसी पोलीस स्थानकात नोंदवली होती.
या संदर्भात मार्केट उपविभागाचे एसीपी संतोष सत्यनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली एपीएमसी पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक यु. एस.आवटी यांच्या नेतृत्वाखाली तपास कार्य हाती घेऊन दोघा आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यावेळी पोलीस चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली.
त्यानंतर चोरट्यांजवळील 4,55,000 रुपये किमतीच्या 11 हिरो होंडा स्प्लेंडर प्लस मोटरसायकली तसेच 80,000 रुपये किमतीच्या दोन हिरो एचएफ डीलक्स मोटरसायकली, अश्या एकूण 5,35,000 रुपये किमतीच्या 13 दुचाकी वाहने जप्त करण्यात आली. याप्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे.




