
सामंत स्मृती आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत सेंट झेवियर्स तीन गटात अजिंक्य
बेलगाम प्राईड/ बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेच्या सहकार्याने एसकेई सोसायटी जीएसएस कॉलेजने आयोजित केलेल्या स्वर्गीय श्रीमती मृदुला मधुकर सामंत स्मृती आंतरशालेय फुटबॉल स्पर्धा -2026 मध्ये सेंट झेवियर्स हायस्कूल संघांनी 14 वर्षांखालील मुला -मुलींच्या गटासह 17 वर्षाखालील मुलींचा गट अशा तिन्ही गटांची अजिंक्यपदे हस्तगत करून नवा इतिहास निर्माण केला आहे.
स्वर्गीय श्रीमती मृदुला मधुकर सामंत स्मृती फुटबॉल स्पर्धेतील 14 वर्षांखालील मुलांच्या गटाच्या अंतिम सामन्यात सेंट झेवियर्स स्कूल संघाने प्रतिस्पर्धी लव्ह डेल सेंट्रल स्कूल संघाचा 2-0 असा पराभव केला. तसेच 14 वर्षांखालील मुलींच्या अंतिम सामन्यात सेंट झेवियर्स संघाने प्रतिस्पर्धी सेंट जोसेफ कॉन्व्हेंट संघावर 2-0 असा विजय मिळवला.
त्याचप्रमाणे 17 वर्षांखालील मुलींच्या गटाच्या अटीतटीच्या अंतिम लढतीत सेंट झेवियर्स हायस्कूल संघाने प्रतिस्पर्धी सेंट जोसेफ कॉन्व्हेंट हायस्कूल संघाला 1-0 असे पराजित केले. या पद्धतीने सेंट झेवियर्सच्या 17 वर्षांखालील मुलींच्या संघाने यावेळी सलग चौथ्या वर्षी बीडीएफए फुटबॉल स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केल्यामुळे या संघाच्या वर्चस्वाचा एक उल्लेखनीय वारसा निर्माण झाला आहे.
सेंट झेवियर्स स्कूलच्या 14 वर्षांखालील मुलींच्या संघाने मात्र यावेळी पहिल्यांदाच बीडीएफए फुटबॉल स्पर्धा जिंकली असून जी त्यांच्या भावी यशस्वी वाटचालीची नांदी आहे. सेंट झेवियर्स स्कूल संघाची उपरोक्त उत्कृष्ट कामगिरी खेळाडू आणि प्रशिक्षक कर्मचाऱ्यांच्या समर्पण, शिस्त, टीमवर्क आणि क्रीडा उत्कृष्टतेचे प्रतिबिंब म्हणावे लागेल.




