Uncategorized
Trending

बॉक्स क्रिकेट स्टेडियम क्रिकेटप्रेमींना सुविधा : लक्ष्मी हेब्बाळकर

बेलगाम प्राईड/ बालभवनतर्फे बेळगाव मध्ये अनेक योजना राबवण्यात येत असून, क्रिकेटप्रेमींना सुविधा मिळावी यासाठी बॉक्स क्रिकेट मैदानाचे बांधकाम करण्यात आले आहे, असे महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले.

बालभवनाच्या वतीने उभारण्यात आलेल्या बॉक्स क्रिकेट स्टेडियमच्या उद्घाटनानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी विशेष लक्ष घेऊन ही योजना आखली आहे. बालभवन, जिल्हा पंचायत तसेच आमदार आसिफ सेठ यांच्या आमदार निधीतून यासाठी अर्थसहाय्य करण्यात आले आहे. सरकारी शाळांतील मुलांना क्रिकेट प्रशिक्षण देऊन गुणवंत खेळाडूंना पुढील स्तरावर पाठवले जाईल. तसेच 5 दिव्यांगांनाही संधी दिली जाईल, असे त्यांनी सांगितले.

कौरी गुड्डा येथे झाडे तोडल्याच्या प्रश्नावर उत्तर देताना मंत्री म्हणाले की, ही केंद्र सरकारची योजना असून ती सरकारी जागा आहे. यात इतर कुणाचा हस्तक्षेप कसा असू शकतो? मला या योजनेची माहिती नव्हती. माध्यमांत बातमी आल्यानंतर मी तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती घेतली आहे. कुणाचीही चूक आढळल्यास कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

मेट्रो भाडेवाढीविरोधात भाजपच्या आंदोलनाबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, पेट्रोल, डिझेल, सोने, चांदी, डॉलर, गॅस यांसह शेकडो वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत, हे सर्वांनाच माहीत आहे.

बालविवाह आणि पोक्सो प्रकरणांबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, अशा अनिष्ट प्रथा मुळापासून नष्ट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यासाठी सर्व विभागांचा आणि जनतेचा सहकार्य आवश्यक आहे.

खासदार जगदीश शेट्टर यांना बेळगावीत पत्ता नाही, ते केव्हातरी येऊन जातात, अशा माध्यमांच्या प्रश्नावर त्यांनी उत्तर दिले की, त्यांनी साईट घेतली असून घर बांधत असल्याचे ऐकले आहे. गृहलक्ष्मी योजनेबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, आतापर्यंत 26 हप्ते देण्यात आले असून प्रत्येकी 52 हजार रुपये वितरित करण्यात आले आहेत.

यावेळी जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी, आमदार आसिफ सेठ, चन्नराज हट्टीहोळी, बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, जिल्हा पंचायत सीईओ राहुल शिंदे आदी उपस्थित होते. याआधी जिल्हा बालभवनातील इनडोअर बॉक्स क्रिकेट मैदानाचे उद्घाटन करण्यात आले.

कार्यक्रमात सार्वजनिक बांधकाम व जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी, विधानपरिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, आमदार आसिफ सेठ, बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, जिल्हा महिला व बालविकास विभागाचे उपसंचालक चेतनकुमार, सीडीपीओ सुमित्रा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!