Uncategorized
Trending

बीम्स नर्सिंग कॉलेजच्या १५ व्या बॅचचा भव्य शपथविधी सोहळा

बेलगाम प्राईड/ वैद्यकीय सेवेचा कणा असलेल्या परिचारिकांनी रुग्णांच्या सेवेसाठी सदैव समर्पण वृत्ती जोपासली पाहिजे, असे प्रतिपादन बीम्सचे संचालक डॉ. अशोक कुमार शेट्टी यांनी केले. बेळगाव येथील बीम्स शासकीय परिचर्या (नर्सिंग) महाविद्यालयातील १५ व्या बॅचच्या प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ, दीपदान आणि शपथविधी सोहळा पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

उत्तम शिक्षण देण्यात बीम्स नर्सिंग कॉलेज राज्यात अग्रेसर आहे. येथून सुवर्णपदकासह उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आज एम्स सारख्या देशातील नामांकित संस्थांमध्ये सेवा बजावत आहेत, ही अभिमानास्पद बाब असल्याचे डॉ. अशोक कुमार शेट्टी यांनी नमूद केले. परिचर्या क्षेत्रातील थोर माता फ्लोरेन्स नाईटिंगेल यांच्या निःस्वार्थ त्यागाचा आदर्श विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात अंगीकारावा, असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला.

यावेळी मुख्य अतिथी म्हणून उपस्थित असलेले बेंगळुरू येथील राजीव गांधी आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव डॉ. तन्वीर अहमद नायकवाडी यांनी मार्गदर्शन केले. समाजात वैद्यकीय सेवेला अत्यंत पवित्र मानले जाते, त्यामुळे या क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकाने रुग्णांमध्ये देव पाहिला पाहिजे. आज जागतिक स्तरावर परिचारकांसाठी मोठ्या संधी उपलब्ध असून विद्यार्थ्यांनी जिद्दीने यश संपादन करावे, असे डॉ. तन्वीर अहमद नायकवाडी यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला नर्सिंग महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नामदेव माळगी यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविक मांडले. यावेळी बीम्सच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी रेश्मा ताळीकोटी, मुख्य वित्त अधिकारी शिल्पा वाली, प्राचार्य डॉ. उमेश कुलकर्णी आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. ईरण्णा पल्लेद यांची प्रमुख उपस्थिती होते.

या सोहळ्याप्रसंगी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. जगदीश गाणगी, आरएमओ डॉ. सरोजा तिगडी, परिचर्या अधीक्षिका कांचनमाला सूर्यवंशी आणि नर्सिंग स्कूलचे प्राचार्य डॉ. प्रकाश कोडली यांनीही उपस्थित राहून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. दीपदान विधीनंतर सर्व प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना सेवाव्रताची शपथ देण्यात आली.

या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. औपचारिक सोहळ्यानंतर विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!