
बेलगाम प्राईड/मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून कॅन्टोनमेंट बोर्ड मराठी प्राथमिक शाळेच्या इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी आरपीडी सर्कल जवळील लोकमान्य बाल ग्रंथालयाला भेट दिली.
बाल ग्रंथालयाच्या वतीने छाया सुतार यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले.या कार्यक्रमाची सुरुवात कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पार्पण करून झाले.त्यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी कुसुमाग्रज यांनी लिहिलेले ‘आला किनारा’ हे गीत सादर करून त्यांना अभिवादन केले. शाळेच्या विद्यार्थिनी श्रेया गावडे व ईशानी पाटील यांनी मराठी भाषा दिन व कुसुमाग्रज यांच्याविषयी आपले मनोगत व्यक्त केले.व्यासपीठावर शाळेचे मुख्याध्यापक पी.एस.बिर्जे, ब्रँड अँबॅसीडर संतोष दरेकर,शिक्षक उदय पाटील, ग्रंथालयाचे व्यवस्थापक नागेश जन्नू , छाया सुतार उपस्थित होते.
सुतार यांनी लोकमान्य सोसायटीच्या वतीने शाळेतील मुलांना वाचनाची गोडी लागून त्यांच्या ज्ञानात भर पडावी यासाठी लोकमान्य बाल ग्रंथालयाची स्थापना करण्यात आली असून या ग्रंथालयांच्या वतीने मुलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करून यशस्वी मुलांना पारितोषिके देऊन प्रोत्साहन देण्यात येते. याचा शालेय विद्यार्थी व शिक्षकांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले.
लोकमान सोसायटीच्या वतीने मुलांना बोधात्मक संस्कारशील असे बाल चित्रपट दाखवण्यात येतात.शाळेच्या मुलांनी उबंटू या चित्रपटाचा आनंद घेतला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वरा सावंत हिने केले तर आभार अदिती आजरेकर हिने केले.शाळेच्या वतीने मुख्याध्यापक पी.एस.बिर्जे यांनी ग्रंथालयाच्या संचालिका डॉ. शोभा नाईक व इतर कर्मचारी वर्गाचे आभार व्यक्त केले.यावेळी शाळेचे शिक्षक धनाजी कुरणे,श्रीकांत काटकर, तुषार कांबळे,नीता गुंजीकर,मनीषा वड्डगोळ,रेणुका अंबी, रेणुका सरमळकर त्याचबरोबर विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




