लायन्स क्लबतर्फे ‘मिसेस बेळगाव दिवा
गीता कित्तूर यांची पत्रकार परिषदेत माहिती

बेलगाम प्राईड/ शहरातील महिलांना प्रोत्साहन, त्यांची प्रतिभा उंचावण्यासाठी व त्यांच्यातील आत्मविश्वास वाढविण्याच्या उद्देशाने लायन्स क्लब ऑफ बेळगावच्यावतीने अनोखा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर ‘मिसेस बेळगाव दिवा २०२६’चे आयोजन करण्यात आले असून हा कार्यक्रम शनिवार दि. २१ मार्च रोजी मिलेनियम गार्डनमध्ये होणार आहे. यासाठी इच्छुकांनी नोंदणी करण्याचे आवाहन लायन्स क्लबच्या अध्यक्षा गीता कित्तूर यांनी केले.
कन्नड साहित्य भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, शाळा व महाविद्यालयांमध्ये मुलींसाठी शौचालय सुविधांची कमतरता असल्याचे प्रकर्षाने जाणवले. या पार्श्वभूमीवर लायन्स क्लब ऑफ बेळगावच्यावतीने ही समस्या निकाली काढण्याच्या उद्देशाने निधी संकलनाचा अनोखा कार्यक्रम हाती घेण्यात येत आहे. त्यानुसार ‘मिसेस बेळगाव दिवा २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी तीन गट करण्यात आले असून पहिला २५ ते ३५, दुसरा ३६ ते ४५ तर तिसरा ४६ ते ५५ वयोगटाचा गट करण्यात आला आहे. असे त्यांनी सांगितले.
सुरुवातीला प्राथमिक फेरी होणार असून सोमवार दि. ९ व मंगळवार दि. १० मार्च रोजी आयोजित केली आहे. यासाठी फिजिकल फिटनेस, टॅलेंट राऊंड, कुकिंग राऊंड होणार आहे. प्राथमिक फेरीनंतर प्रत्येक गटातून अंतिम फेरीसाठी १० जणांची निवड करण्यात येणार आहे. प्रत्येक गटातील विजेत्याला १० हजार रोख रक्कम व क्राऊन प्रदान येणार असून उपविजेत्याला पारितोषिक देण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक गटातील विजेते व उपविजेत्याची अंतिम फेरीसाठी निवड केली जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
अंतिम फेरी २१ मार्च रोजी होणार असून पारंपरिक वेशभूषेतून कॅटवॉक, परिचय आणि प्रश्नोत्तर होणार आहे. अंतिम फेरीतील विजेत्याला ५० हजार रु., क्राऊन व पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे.
नावनोंदणीसाठी ५०० रुपयांचे शुल्क आकारण्यात येणार आहे. गुरुवार दि. ५ मार्चअखेर नावनोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. नोंदणीसाठीचे फॉर्म मारुती गल्लीतील श्री अप्लायन्स, खडेबाजार येथील उप्पीन हर्बस्, शहापूर येथील अंबिका येथे उपलब्ध आहेत. फॉर्मसह आधारकार्ड व फोटो टिळकवाडी येथील गीता ब्युटी ॲन्ड स्पा येथे दिले जातील असे कित्तूर यांनी केले आहे.
यावेळी प्रतिभा मुतालिक, भारती वाडवी, लक्ष्मी कोळकी, शीतल बोगार, श्रीधर उप्पीन, हेमंत कित्तूर, सोमनाथ कोळकी, उदय वाडवी, प्रदीप मुतालिक आदी उपस्थित होते.




