म.ए.युवा समिती महिला विभागाच्या वतीने हळदी कुंकू कार्यक्रम त्या निमित्त विविध कर्तबगार महिलांचे सत्कार.

बेलगाम प्राईड/युवा समितीच्या महिला विभागाच्या वतीने नुकताच कावळे संकुल बेळगाव येथे हळदीकुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या निमित्ताने बेळगावातील कर्तबगार महिलांचा सत्कार तसेच महिलांसाठी विविध स्पर्धा संपन्न झाल्या.
सदर कार्यक्रमाची सुरूवात राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. रोपट्याला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून माजी नगरसेविका सुधा भातकांडे , समिती कार्यकर्त्या शिवानी पाटील, प्रा .मधुरा गुरव उपस्थित होत्या.
सौ श्वेता कुडूचकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, आणि कार्यक्रमाचा उद्देश सांगितला. त्या म्हणाल्या की चूल आणि मूल यापलीकडे महिलांनी आपल्यातील सुप्त गुणांना ओळखून आपलं वेगळं अस्तित्व आहे, हे सिद्ध करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. तसेच घरातील पुरुष मंडळींच्या सारखेच विविध सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत झाले पाहिजे, त्यासाठी भविष्यात सगळ्या जणीं एकत्र याव्यात त्यांच्या भेटीगाठी व्हाव्यात यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगितले.

त्यानंतर नुकतीच मध्यप्रदेश येथील मालवांचल विद्यापीठ इंदौर येथून मेडिकल सर्जिकल नर्सिंग विषयात (पी. एच. डी.) डॉक्टरेट पदवी संपादित केल्या बद्दल डॉ.प्रा. वृषाली उर्फ सई शेखर पाटील यांचा तसेच मराठा मंडळ महाविद्यालयाच्या प्राध्यापिका ज्यांनी राणी चन्नमा विद्यापीठातून मराठी विभागातून २०१८ साली पहिली पी. एच. डी. “बेळगाव जिल्ह्यातील लोक साहित्याचा अभ्यास” या विषयात संपादित केली होती. अशा डॉ.सौ. वृषाली कदम दड्डीकर यांचा आणि बेळगाव जायंटस ग्रुप सखीच्या अध्यक्षपदी नुकतीच सामजिक कार्यकर्त्या सौ.सुलक्षणा सदानंद शिन्नोळकर यांची निवड झाली याबद्दल या तिघींचा जाहीर सत्कार शाल, पुष्पगुच्छ आणि पुस्तक देऊन उपस्थित प्रमुख पाहुण्या तसेच प्राजक्ता केसरकर,गौरी केळवेकर, तनुजा कावळे, श्वेता कुडूचकर, वृषाली पाटील, वैष्णवी चौगुले, विना केळवेकर यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी बोलताना सौ. शिवानी पाटील म्हणाल्या इतर पक्षात महिला जशा पुढाकार घेतात तशा समितीच्या कार्यात सुद्धा महिलांनी पुढे आले पाहिजेत, आणि प्रत्येकीने मराठी भाषा आणि बाणा जपण्यासाठी कार्य केले पाहिजे.डॉ. वृषाली उर्फ सई शेखर पाटील यांनी महिलांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले.
डॉ. वृषाली कदम-दड्डीकर यांनी जातीवरची गाणी, ओव्या आणि लोकसाहित्यामध्ये जुन्या काळात महिला कशाप्रकारे जीवन जगत होत्या त्याची माहिती उलगडून सांगितली. तसेच महिलांनी महिलांसोबत भेदभाव करू नये तर प्रत्येकीने घराच्या बाहेर पडत समाजात आपले योगदान दिले पाहिजे असे मत व्यक्त केले.
प्रा. मधुरा गुरव यांनी महिलांनी आपल्या कठीण काळात लोक काय म्हणतील याकडे लक्ष न देता काळानुरूप धीट झाले पाहिजे आणि घरात बसून न राहता बाहेरच्या जगात मुक्तपणे वावरले पाहिजे याबद्दल मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात महिलांसाठी विविध खेळ आयोजित करण्यात आले होते त्यात सर्व महिलांनी उस्फुर्त सहभाग घेतला आणि बक्षिसे मिळविली. हळदीकुंकू आणि वाण (भेटवस्तू) देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.
सदर कार्यक्रमाला सौ.सविता चंदगडकर, वृषाली घाडी,पल्लवी इनामदार, प्रतिभा अष्टेकर, गायत्री जाधव, राजश्री जाधव, स्नेहल कदम, कोमल हुद्दार, अंकिता देसाई,मालन शिंदे,वर्षा कदम, पुनम मोरे, लक्ष्मी केळवेकर, स्नेहल पाटील, काजल पाटील, अंकिता चव्हाण,पूजा निलजकर, नेहा मोरे, संगीता अणवेकर, नेहा बोकडे, सोनाली राम किरमटे, सोनाली शाम किरमटे आदी महिला उपस्थित होत्या, साक्षी गोरल हिने सूत्रसंचालन केले तर सौ.तनुजा कावळे यांनी आभार मानले.




