
बेलगाम प्राईड/ मुतगे (ता. जि. बेळगाव) येथील होतकरू जलतरणपटू स्वतीक नारायण पाटील याने ऑस्ट्रेलिया येथे झालेल्या जलतरण स्पर्धेत पॅरा वर्ल्ड सिरीज -2026 या दिव्यांगांच्या जागतिक जलतरण स्पर्धेत रौप्य पदक पटकावून बेळगावचे नाव सातासमुद्रपलीकडे झळकविले आहे.
ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट अॅक्वेटिक सेंटर येथे गेल्या 20 ते 22 फेब्रुवारी 2026 दरम्यान पॅरा वर्ल्ड सिरीज -2026 ही जागतिक जलतरण स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली. जगभरातील विविध देशांच्या मातब्बर दिव्यांग जलतरणपटूंनी या स्पर्धेत भाग घेतला होता. त्यामध्ये भारताचे प्रतिनिधित्व करताना मुतगे गावचा सुपुत्र स्वतीक नारायण पाटील याने 400 मी. वैयक्तिक मिडले शर्यतीमध्ये दुसऱ्या क्रमांकासह रौप्य पदक मिळविले.
स्विमर्स क्लब बेळगाव आणि अॅक्वेरियस स्विम क्लब बेळगावचा सदस्य असलेला स्वातीक हा गेल्या 13 वर्षापासून बेळगाव येथील सुवर्ण जेएनएमसी स्विमिंग पूल (ऑलिंपिक आकार) येथे जलतरण गुरु उमेश कलघटगी यांच्यासह प्रशिक्षक अक्षय शेरेगर, अजिंक्य मेंडके, नितीश कुडुचकर व गोवर्धन काकतकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोहण्याचा सराव करतो.
स्वतीक पाटील याने आतापर्यंत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करताना 33 सुवर्ण, 7 रौप्य व 2 कांस्य अशी 42 राष्ट्रीय पदके कमावली आहेत.यामध्ये आता वरील प्रमाणे आणखी एका रौप्य पदकाची यामध्ये भर पडली असून जागतिक स्पर्धेतील यशाबद्दल स्वतिक याचे जलतरण क्षेत्रासह सर्वत्र अभिनंदन होत आहे.




