
बेलगाम प्राईड/ पोदार इंटरनॅशनल स्कूल, कोल्हापूर यांनी आयोजित केलेल्या पोदार फुटबॉल करंडक -2026 स्पर्धेतील 14 वर्षाखालील मुलांच्या गटाचे अजिंक्यपद एमएसडीएफ (रेड डेव्हिल्स) संघाने हस्तगत केले.
पोदार फुटबॉल करंडक -2026 स्पर्धेतील 14 वर्षाखालील स्पर्धेत एकूण 21 संघांनी भाग घेतला होता. एमएसडीएफ संघाने त्यांच्या पहिल्या सामन्यात 4-0 असा विजय मिळवून त्यांच्या मोहिमेची सुरुवात प्रभावी पद्धतीने केली. या सामन्यात नेविन पत्के याने 3 गोल आणि आराध्या नाकाडी याने 1 गोल केला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात एमएसडीएफ संघाने प्रतिस्पर्धी संघाला 5-1 अशा गोल फरकाने पराभूत केले.
त्यांच्या हुसेन जमादार व नेविन पत्के यानी प्रत्येकी 2 गोल आणि आराधी नाकाडी 1 गोल केला. त्यानंतर एमएसडीएफ संघाने पुढील सामन्यात प्रतिस्पर्ध्यावर 5-0 अशा गोल फरकाने विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. विजेत्या संघातर्फे हुसेन जमादार याने 2 गोल, तसेच नेविन पत्के, आराधी नाकाडी व अर्कान बडेगर यांनी प्रत्येकी 1 गोल नोंदवला. उपांत्य फेरीच्या सामन्यात 3-0 अशा गोल फरकाने विजय संपादन करणाऱ्या एमएसडीएफ संघातर्फे हुसेन जमादार याने 2 गोल तर नेविन पत्के यांनी 1 गोल नोंदवला.
अंतिम सामन्यात देखील एमएसडीएफ संघाने आपले वर्चस्व कायम राखताना प्रतिस्पर्धी कोल्हापूरच्या सेंट झेवियर्स सीबीएसई स्कूलचा 4-0 असा दणदणीत पराभव करून विजेतेपदाचा करंडक जिंकला. त्यांच्या आराध्या नाकाडी याने 2 गोल तर नेविन पत्के व अर्कान बडेगर यांनी प्रत्येकी एक गोल करत संघाच्या विजया सिंहाचा वाटा उचलला. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल विजेत्या संघातील खेळाडू, प्रशिक्षक, कर्मचारी आणि व्यवस्थापनाचे अभिनंदन होत आहे




